‘हल्‍लाबोल’ने नागपूर ‘जॅम’!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

नागपूर - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. मुख्य रस्त्याने चालायलादेखील जागा मिळू नये, एवढी अफाट गर्दी मोर्चात लोटली. पण, या जनआक्रोशाने नागपूर जॅम झाले. अत्यंत नेटाने आणि शिस्तीत निघालेला मोर्चा व्यवस्थित असला तरी शहरातील वाहतूक व्यवस्था मात्र विस्कळीत झाली. 

नागपूर - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. मुख्य रस्त्याने चालायलादेखील जागा मिळू नये, एवढी अफाट गर्दी मोर्चात लोटली. पण, या जनआक्रोशाने नागपूर जॅम झाले. अत्यंत नेटाने आणि शिस्तीत निघालेला मोर्चा व्यवस्थित असला तरी शहरातील वाहतूक व्यवस्था मात्र विस्कळीत झाली. 

काचीपुरा चौकातून काँग्रेसने, तर काँग्रेसनगर चौकातून राष्ट्रवादी काँग्रेसने विधानभवनाकडे कूच केले. दोन्ही मोर्चे जनता चौकात एकत्र आल्यानंतर मोर्चाने भव्य स्वरूप धारण केले. दोन्ही पक्षांमधील नेत्यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा टी-पॉइंटच्या दिशेने जाताना रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागपूरकरही प्रेक्षक म्हणून सहभागी झाले. काँग्रेसच्या रथावर सवार होऊन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील मात्र संपूर्ण मोर्चात पायी सहभागी झाले. तर खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री सचिन अहीर यांनी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत राष्ट्रवादीच्या मोर्चाचे नेतृत्व केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन्ही मोर्चे आपापल्या स्थळांवरून निघाले आणि जनता चौकात एकत्र आले. रामदासपेठ, धंतोली, सीताबर्डी या तीन मुख्य भागांतून मोर्चा निघाल्याने चारही बाजूने येणारी वाहतूक जवळपास दीड तास खोळंबली होती. हा संपूर्ण परिसर हॉस्पिटल्सने व्यापलेला असल्याने काही ठिकाणी ॲम्बुलन्सलादेखील मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला. विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह जवळपास सर्वच स्थानिक नेते पायीवारी करत सभास्थळी दाखल झाले. संदल, ढोल-ताशे, ब्रास बॅंड, भजनी मंडळाच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यात आला. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी एकत्र येऊन मोठ्या मनाने काम केले तर पुढच्या निवडणुकीत नक्कीच परिवर्तन होईल.
- प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री

२०१९ मध्ये सर्वसामान्यांनी साथ दिली, तर आम्ही एकत्र येऊन आपलं सरकार स्थापन करू. 
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

सध्याचे सरकार म्हणजे गोलमाल रिटर्न चित्रपटाप्रमाणे होय. केवळ ट्विटरवर सरकारचे कामकाज सुरू आहे.
- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते विधानसभा

मुख्यमंत्र्यांच्या घरी दुभती गाय नेऊन गायीची धार काढायला लावणार आहे. शेतकरीपुत्र असतील तर त्यांनी गायीची धार काढून दाखवावी.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विधान परिषद

सरसकट कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही.
- जयंत पाटील, आमदार शेकाप 

आपल्या पत्नीला सोडताना जी व्यक्ती एकदाही ‘तलाक’ म्हणत नाही, ती व्यक्ती ‘तीन तलाक’च्या गोष्टी करते.
- मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस

शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा निर्धार या मोर्चातून करा.
- सुनील तटकरे, राष्ट्रवादी नेते

Web Title: nagpur vidarbha news traffic jam by hallabol agitation