इमर्जन्सी लॅण्डिंगनंतर दोन वैमानिक निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नागपूर - एअर इंडियाच्या विमानाने कोलकाता येथून मुंबईच्या दिशेने उड्डाण भरले. मात्र, वैमानिक चाके आत घेण्यास विसरले. या हलगर्जीपणामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण संकटात सापडले होते. चूक लक्षात येताच या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. या गंभीर स्वरूपाच्या निष्काळजीपणासाठी दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.

वैमानिकांची छोटीशी चूकही विमानातील प्रवाशांसाठी जीवघेणी ठरू शकते. याबाबतची पुरेपूर कल्पना असूनही वैमानिकांचा निष्काळजीपणा वेळोवेळी उघडकीस येत असतो. असाच काहीसा प्रकार इंडियाच्या एआय-६७६ या कोलकाताहून मुंबईच्या दिशेने उड्डाण भरलेल्या विमानात घडला. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे बिंग मंगळवारी फुटले. विमानाने नियोजित वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता कोलकाता येथून प्रयाण केले. उड्डाणानंतर विमानाची चाके आतल्या भागात घेतली जातात. मात्र, या विमानातील वैमानिक चाके आत घेण्याचे विसरले. त्यामुळे इंधन फार जास्त लागले. इंधन संपत असल्याचा इशारा मिळताच वैमानिकांनाही आश्‍चर्य वाटले.

त्यांनी चाचपणी केली असता, चूक लक्षात आली. गांभीर्य लक्षात घेत वैमानिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर लॅण्डिंगचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर विमानतळाशी संपर्क साधून इमर्जन्सी लॅण्डिगची परवानगी घेऊन विमान उतरविण्यात आले. वैमानिकांना उड्डाणापूर्वी गरजेनुसार इंधन असल्याची खात्री करून घ्यावी लागते. शिवाय प्रवासदरम्यान मधून मधून इंधनाच्या स्थितीवर लक्ष ठेवावे लागते. परंतु, धोक्‍याच्या पातळीपर्यंत इंधन कमी होईपर्यंत वैमानिकांचे लक्षच नव्हते. हा संपूर्ण प्रकार गांभीर्याने घेत एअर इंडिया व्यवस्थापनाने दोन्ही वैमानिकांना निलंबित केल्याची माहिती आहे. विमानतळाशी संबंधित सूत्रांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

Web Title: nagpur vidarbha news two pilot suspend after emergency landing