जगातील २२ राष्ट्रांमध्ये ‘वंदेमातरम’चा भाव - डॉ. राकेश सिन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

नागपूर - हिंदुस्थानातील विशिष्ट संप्रदायाकडून ‘वंदेमातरम’ला विरोध दर्शविला जात आहे. परंतु, अनेक मुस्लिम राष्ट्रांसह जगातील २२ देशांच्या राष्ट्रगीतात समर्पणाचा भाव अंतर्भूत करण्यासाठी राष्ट्रभूमीला माता संबोधल्याची माहिती इंडिया पॉलिसी फाउंडेशनचे संचालक डॉ. राकेश सिन्हा यांनी दिली.

नागपूर - हिंदुस्थानातील विशिष्ट संप्रदायाकडून ‘वंदेमातरम’ला विरोध दर्शविला जात आहे. परंतु, अनेक मुस्लिम राष्ट्रांसह जगातील २२ देशांच्या राष्ट्रगीतात समर्पणाचा भाव अंतर्भूत करण्यासाठी राष्ट्रभूमीला माता संबोधल्याची माहिती इंडिया पॉलिसी फाउंडेशनचे संचालक डॉ. राकेश सिन्हा यांनी दिली.

संवेदना परिवार संस्थेतर्फे शनिवारी चिटणीस सेंटरच्या सभागृहात ‘वर्तमान परिस्थितीत अखंड भारताची संकल्पना’ विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी होते. याप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री सुनील आंबेकर, संवेदना परिवारचे सागर कोतवालीवाले होते.

डॉ. राकेश सिन्हा यांनी इजिप्त आणि बांगलादेशच्या राष्ट्रगीतातही राष्ट्रभूला माता संबोधण्यात आल्याकडे लक्ष वेधले. इजिप्तमध्ये ३, तर बांगलादेशच्या राष्ट्रगीतात तब्बल ५ वेळा माता हे संबोधन आल्याचे सांगितले. शंभर टक्के हिंदू असलेल्या विस्तीर्ण हिंदुस्थानचे षडयंत्रादाखल वेळोवेळी तुकडे पाडण्यात आले. लोकसंख्येने प्रमाण अधिक दाखविण्यासाठी हे प्रयत्न झाले. पाकिस्तानची फाळणी सर्वांनाच माहिती आहे. परंतु, बर्मा वेगळा कसा झाला, त्याबाबत कुणीच बोलत नाही. आजही हिंदूंचे प्रमाण अधिक दर्शविण्यासाठीच आसाम, बंगाल, काश्‍मीर तोडण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

भारतीयांना एकत्र जोडणारे चाणक्‍य आजही देशात आहेत. परंतु, हिंदू साम्राज्य विस्तारासाठी चंद्रगुप्ताची गरज असून, देशातील घराघरातील मुलगा चंद्रगुप्त व्हावा लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वत:च एक विचार झाला आहे. हिंदू राष्ट्र विस्ताराची संकल्पना संघाचीच असून, संकल्पनेतील सीमा दररोज विस्तारत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संचालन सुनील नरसापूरकर यांनी केले. रश्‍मी फडणवीस यांनी आभार मानले.
 

अंतर्गत शक्तींचाच धोका
संस्कृती हीच भारताची ओळख असून, भारताचे अस्तित्व जगासाठी आवश्‍यक आहे. देशाच्या अस्तित्वाला परकीय शक्तीपासून नव्हे, तर अंतर्गत शक्तींचाच धोका अधिक असल्याचे सुनील आंबेकर म्हणाले.

Web Title: nagpur vidarbha news 'Vande Mataram' sentiment in 22 nations of the world