पाणीबाणीच्या उंबरठ्यावर संत्रानगरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरीसह मूळ पेच नदी धरणानेही तळ गाठला आहे. पावसाने हजेरी न लावल्यास येत्या महिनाभरापासूनच शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. याशिवाय शहराला  पाणीपुरवठा होऊ शकेल, असे पर्यायही आटले आहेत. त्यामुळे प्रथमच दिवाळीपूर्वी शहर पाणीबाणीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरीसह मूळ पेच नदी धरणानेही तळ गाठला आहे. पावसाने हजेरी न लावल्यास येत्या महिनाभरापासूनच शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. याशिवाय शहराला  पाणीपुरवठा होऊ शकेल, असे पर्यायही आटले आहेत. त्यामुळे प्रथमच दिवाळीपूर्वी शहर पाणीबाणीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.

पावसाने दडी मारल्याने एकीकडे शेतकरी संकटात असताना सामान्य नागरिकांनाही त्याचा जोरदार फटका महिनाभरात बसण्याची शक्‍यता बळावली आहे. सामान्य नागरिकांना पिण्याचेही पाणी मिळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. नागपूर शहराला तोतलाडोह येथील पेच नदीवरील धरणाच्या बफर धरण नवेगाव खैरी, कन्हान नदीतून पाणीपुरवठा होतो. कन्हान नदीतून उत्तर, पूर्व व दक्षिण नागपूरच्या काही भागात पाणीपुरवठा होतो. 

गेल्या काही दिसांपासून या भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गढूळ पाणीपुरवठ्याबाबत आज ‘नीरी’, ’व्हीएनआयटी’च्या तज्ज्ञांनी या नदीला भेट दिली. या तज्ज्ञांनी कमी पावसामुळे नदीचे पाणी आटले असून, शेवटच्या स्तरातील शेवाळ असलेल्या पाणी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जात आहे.

परंतु, शेवाळमुळे रंग  वेगळा असल्याचे नमूद केले. अर्थात कन्हान नदीलाही पाणी नसल्याचे दिसून येत आहे.  याशिवाय शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या नवेगाव खैरीतील धरणात सध्या ५० टक्के साठा आहे. यातून शहराला पाणीपुरवठा होत आहे. परंतु, या धरणाचे मूळ धरण असलेल्या पेच नदीत केवळ १० टक्के साठा आहे. त्यामुळे नवेगाव खैरीतून शहराच्या पाणीपुरवठ्यावला कधीही ब्रेक लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पेच नदी धरण मागील वर्षी ८०.४५ टक्के भरले होते, हे विशेष. आता फक्त १० टक्के पाणी असल्याने शहरात केव्हाही पाणीबाणी शक्‍यता नाकारता येत नाही. नवेगाव खैरी व कन्हान येथून पाणी बंद झाल्यास गोरेवाडा तलाव पर्याय आहे. परंतु, येथे केवळ ६५ टक्के शहराला चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी स्थिती आहे. गोरेवाडा तलावानेही तळ गाठल्याने शहरापुढे भीषण टंचाई उभी असून, महापालिका मात्र अद्याप हातावर हात धरून आहे.

पालकमंत्र्यांची घोषणा दिलासादायक 
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणीटंचाईशी निपटण्यासाठी मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाणी घेण्याची केलेली घोषणा दिलासादायक आहे. परंतु, चौराई धरणातून कालव्याद्वारे पाणी आणण्यासाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. पाच, सहा वर्षांनी या  प्रकल्पाचा निश्‍चित फायदा होईल. पालकमंत्र्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा असला तरी  नागपूरकरांना तत्काळ पाणी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांच्याकडेही पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे.

पाणीबचतीवर जनजागृतीची गरज 
पाऊस अन्‌ जलाशयांची स्थिती बघता सद्यस्थितीत पाणीबचतीवर जनजागृती हा एकमेव पर्याय असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, महापालिकेने अद्याप याबाबत कुठलाही  कार्यक्रम आखला नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पाणी बचतीवर व्यापक जनजागृतीसाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज ग्रीन व्हिजिल संस्थेचे कौस्तुभ चॅटर्जी यांनी व्यक्त केली.

जलाशयातील स्थिती 
शहराला पाणीपुरवठा करणारे नवेगाव खैरी धरण ५० टक्के भरले आहे. मात्र, मागील वर्षी १७ ऑगस्टपर्यंत येथे ७८ टक्के पाणी होते. नवेगाव खैरी धरणाचे मूळ धरण असलेल्या पेंच धरणात यंदा १० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच धरणात ८० टक्के पाणी होते. ऑगस्टमध्ये दुथडी भरून वाहणारी कन्हान नदीही ओस पडली असून, पर्यायी गोरेवाडा तलावात पाच दिवस पुरेल इतकेच पाणी आहे.

Web Title: nagpur vidarbha news water issue