महापालिका उद्यानांत महिलांची कुचंबणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

शौचालयाचा अभाव - पुरुषांना मुतारीसाठी झुडपांचा आसरा

नागपूर - शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासह फिरण्यासाठी महापालिकेसह नासुप्रचे दीडशेवर उद्याने आहेत. परंतु, महापालिकेच्या उद्यानांमध्ये टॉयलेटचीच सुविधा नाही. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत असून, आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

शहरात महापालिकेची ९३ उद्याने आहेत. या उद्यानांमध्ये सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी अनेक नागरिक जातात. 

शौचालयाचा अभाव - पुरुषांना मुतारीसाठी झुडपांचा आसरा

नागपूर - शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासह फिरण्यासाठी महापालिकेसह नासुप्रचे दीडशेवर उद्याने आहेत. परंतु, महापालिकेच्या उद्यानांमध्ये टॉयलेटचीच सुविधा नाही. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत असून, आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

शहरात महापालिकेची ९३ उद्याने आहेत. या उद्यानांमध्ये सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी अनेक नागरिक जातात. 

यापैकी ४९ उद्याने नागरिकांच्या आरोग्यालाच धोकादायक ठरल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या उद्यानांमध्ये टॉयलेटची सुविधाच नसल्याचे आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना महापालिकेने दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे. या उद्यानांत टॉयलेटची सुविधा नसल्याने पुरुष झाडा-झुडपांच्या आडोशाला मुतारीसाठी जातात. या वेळी महिलांची दुहेरी कुचंबणा होते. झाडा-झुडपांच्या आडोशाला असलेल्या पुरुषांमुळे महिलांना अवघडल्यासारखे होते. तसेच महिलांसाठी बाथरूम नसल्याने किडनीवर ताण येऊन आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.

महिला महापौर असतानाही जाच
उद्यानांमध्ये पुरुष मुतारीसाठी सहज जागा शोधून घेतात. मात्र, महिलांना त्रास सहन करावा लागतो. दहा वर्षांत दोन महिला महापौर झाल्या. आता नंदा जिचकार महापौर आहेत. परंतु, महिलांच्याच बाबतीत त्यांचेही धोरण उदासीनच असल्याचे दिसून येते. उद्यानाप्रमाणे बाजारातही महिलांना कुचंबणा सहन करावी लागत आहे.

आरोग्याला धोका
उद्यानांमध्ये फिरायला येणारे साधारणपणे अर्धा तास फिरतात. फिरायला निघण्यापासून तर घरी पोहोचेपर्यंत सर्वसामान्यपणे नागरिक तासभर बाहेर राहतात. शौचालय नसलेल्या उद्यानांमुळे एक तास लघवी रोखण्यावाचून महिलांना पर्याय नाही. त्यामुळे त्यांना युरीनरी ट्रॅक्‍ट इन्फेक्‍शन अर्थात मूत्र मार्गात होणाऱ्या संक्रमणाचा आजार होतो. याशिवाय किडनीचे आजारही होण्याची शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.

उद्यानांमध्ये शौचालयांची नसणे ही गंभीर बाब आहे. महिलांसाठी यावर तत्काळ बैठक घेऊन अधिकाऱ्यांची नक्कीच चर्चा करण्यात येईल. केवळ चर्चाच नाही तर उद्यानांमध्ये शौचालये तयार करण्यासंदर्भात महिला व बालकल्याण विभागातर्फे प्राधान्य देण्यात येईल. शक्‍य तेथे वॉर्डफंडातूनही शौचालये उभारणीचा प्रयत्न करण्यात येईल. 
- वर्षा ठाकरे, महिला व बालकल्याण सभापती.

महापौरांच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह  
महापौर नंदा जिचकार यांना या विषयावर प्रतिक्रियेसाठी फोन केला असताना त्यांनी घेतला नाही. त्यांच्या दोन्ही मोबाईलवर फोन करण्यात आला. याशिवाय महिलांच्या गंभीर विषयावर प्रतिक्रिया हवी, असा मेसेजही त्यांना करण्यात आला. त्यांनी मेसेजचेही उत्तर दिले नाही. त्यामुळे  महिलांच्या विषयावर महापौरांच्या गांभीर्यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

मुलांसाठी पाणी नाही, सुरक्षाही वाऱ्यावर 
अनेकजण लहान मुलांना घेऊन उद्यानांत येतात. लहान मुले अनेकदा पिण्याचे पाणी मागतात.  परंतु, ३१ उद्यानांत त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोयच नसल्याने पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय सायंकाळी अंधार होईस्तोवर उद्यानांत लहान मुले, तरुण मुली  फिरत असतात. परंतु, ५४ उद्यानांमध्ये सुरक्षारक्षकच नसल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे लहान मुले, तरुणींची सुरक्षाही वाऱ्यावर आहे. 

Web Title: nagpur vidarbha news Women's dilemma in municipal gardens