पावसाने प्रशासन, कंत्राटदारांचे पितळ उघडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नागपूर - शहरात चार तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने महापालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांचे पितळ उघडे पाडले. शहरातील स्टॉर्म ड्रेन लाइन स्वच्छ न झाल्याने प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. खोलगट भागातील घरांमध्ये पाणी शिरले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतापामुळे रिंग रोडवरील वस्त्यांतील घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मानेवाडा-बेसा रोडवर वर्षभरापूर्वीच तयार केलेल्या पुलाजवळील रस्त्याचा भाग खचल्याने कंत्राटदाराने निकृष्ट कामे केल्याचेही अधोरेखित झाले.

शहरातील प्रत्येक चौक, मैदानांमध्ये तलाव साचल्याचे चित्र दिसून आले, तर काही भागांत झाडेही कोसळली. चार तासांत तब्बल १११ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून बहुमजली इमारतीच्या बेसमेंटसह ठिकठिकाणी पाणी घुसल्याने अग्निशमन विभागाचीही चांगलीच दमछाक झाली. 

वस्त्यांमध्ये पाणी 
केवळ चार तासांच्या पावसाने नाग नदी, पोरा व पिवळ्या नदीसह शहरातील छोटेमोठे नाले भरभरून वाहिले. नाग नदी, पिवळी नदीच्या किनाऱ्यावरील काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. विशेषतः रामदासपेठ, धंतोली, सीताबर्डी, शंकरनगर, गोकुळपेठ, मेडिकल चौक, रेशीमबाग मैदान, सदर, नरेंद्रनगर, बेसा, हुडकेश्‍वर रोडवरील अनेक वस्त्यांत पाणी शिरले. 

पुढील चार दिवस पावसाचे 
हवामान विभागाने सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत १११.६ मिलिमीटर पावसाची नोंद केली. शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल १५३ मिलिमीटर पाऊस झाला. छत्तीसगड आणि ओडिशामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू असून, पावसाचा जोर आणखी तीन-चार दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. शनिवारी संपूर्ण विदर्भात ‘ॲलर्ट’ अर्थात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

शाळेमध्ये शिरले पाणी 
पावसामुळे शाळांमध्येही पाणी शिरल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची निराशा झाली. डिप्टी सिग्नल येथील संजय गांधीनगर प्राथमिक शाळेत पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर  काढून सुटी देण्यात आली. याशिवाय रिंग रोडवरील खोलगट भागातील शाळांमध्येही पाणी शिरल्याने सुटी होऊनही विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली. 

दोनच दिवसांत सरासरी गाठली
नागपुरात काल आणि आज झालेल्या पावसाने अख्ख्या जून महिन्यातील सरासरी गाठली. आज सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत एकूण १११.६ मिलिमीटर आणि सोमवारी ४१.२ मिलीमिटर पाऊस झाला. जून महिन्यात सरासरी १६८ मिलिमीटर पाऊस पडतो. दोन दिवसांतच सरासरीच्या जवळपास (१५३ मिलिमीटर ) पावसाची नोंद करण्यात आली. या महिन्यात आतापर्यंत २५४ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली.

बेसा पुलाजवळील रस्ता खचला

सिमेंट रोडजवळील घरांत शिरले पाणी

चौकांमध्ये तलाव
सिरसपेठमध्ये भिंत पडली

स्टॉर्म ड्रेन तुंबल्याने रस्ते जलमय

खोलगट भागांत पाणीच पाणी

Web Title: nagpur vidarbha rain in nagpur