सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची मुदत ३० पर्यंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नागपूर - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) कै. नारायण बनसोड व कै. सुधा बनसोड यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने विदर्भातील एक  विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशा दोन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करीत आहे. ही  शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी बनसोड कुटुंबातील पुष्पा सुंदर, आशा उपासनी, अरुण बनसोड,  पद्मा ठुसे व प्रदीप बनसोड यांनी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला दिलेल्या १२ लाख रुपयांच्या देणगीच्या व्याजामधून दरवर्षी या दोन शिष्यवृत्त्या विदर्भामधील गरजू, होतकरू व  हुशार विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांतील रहिवासी असलेले व आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत शनिवार, ३० सप्टेंबर आहे.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च २०१७ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतचिकित्सा, वास्तुविशारद किंवा नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी किंवा विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असणे आवश्‍यक आहे.

अशा पात्र विद्यार्थ्यांनी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा. दोन्ही शिष्यवृत्त्या प्रत्येकी रु. १२ हजारांच्या असून विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या मिळणार आहेत.

असा करा अर्ज
पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी साध्या कागदावर अर्ज करावेत. अर्जात स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता व फोन नंबर, मार्च २०१७ च्या उच्च माध्यमिक परीक्षेतील गुण तसेच पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा उल्लेख करावा. 

अर्जासोबत गुणपत्रिकेची व उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत  जोडावी. हे अर्ज ‘कार्यकारी सचिव, ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’, ‘सकाळ’ कार्यालय, ५९५ बुधवार पेठ, पुणे ४११००२ या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत शनिवार, ३० सप्टेंबर आहे. 

आलेल्या सर्व अर्जांमधून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशा  दोन विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करेल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनतर्फे संपर्क केला जाईल.

माहितीसाठी संपर्क 
 (०२०) २४४०५८९५, २४४०५८९७, २४४०५८९४ (सकाळी १० ते दुपारी १ -रविवार व शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)

Web Title: nagpur vidarbha sakal india foundation scholarship form