पाण्यावरून प्रशासन पाणी पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नागपूर : शहरावरील जलसंकट, दूषित पाणी, असमान वितरण, अपूर्ण कामांमुळे पाणीटंचाई, टॅंकरने पाणीपुरवठा, ओसीडब्ल्यू आणि एनईएसएलची कामगिरी यावरून विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी आक्रमकपणे शाब्दिक हल्ला चढवित प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळविले. महापौर नंदा जिचकार यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आयुक्तांनी तूर्तास कपातीची शक्‍यता नसल्याचे स्पष्टीकरण देत प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरही विरोधकांनी अघोषित पाणी कपातीचा आरोप केला तर सत्ताधाऱ्यांनीही कुठल्याही प्रकारच्या कपातीची गरज नसल्याचे सांगितले.

महाल येथील नगरभवनात पार पडलेल्या महापालिकेच्या पाण्यावरील विशेष सभेत सदस्यांना उत्तरे देताना अनेकदा अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सुरुवातीलाच पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबत प्रशासनाला विचारणा केली. मात्र, सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी विरोधकांच्याच मागणीवरून सभा आयोजित केली, परंतु त्यांचेच सदस्य नसल्याचे ताशेरे ओढले. आम्ही गंभीर आहोत, सत्ताधारी बाकावरील सदस्यच गंभीर नसल्याचा प्रत्यारोप वनवे यांनी करीत सभेच्या सुरुवातीलाच आक्रमकतेचे संकेत दिले. प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी 85 हजार ग्राहकांना 24 तास पाणी मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या माहितीवरून विधानसभेत सांगितले. कागदोपत्री अधिकारी सर्रास खोटे बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली. आभा पांडे यांनी जलसंपत्ती प्राधिकरणाने वारंवार इशारा दिल्यानंतरही प्रशासन झोपेत असल्याची टीका केली. यावेळी आईशा उईके यांनी प्रभागातील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे जीव धोक्‍यात आल्याचे सांगितले. त्यांनी विहिरी स्वच्छ करताना नगरसेवकांना सांगितले जात नसल्याकडे लक्ष वेधले. यावर जलप्रदाय अधिकाऱ्यांनी लोककर्म अधिकाऱ्यांचे नाव पुढे केले. विहिरीतील गाळ का काढला नाही? किती विहिरीतील गाळ काढला? या प्रश्‍नांसह महापौरांनी अधिकाऱ्यांना झापले. महापौरांनी एक संधी देत असल्याचे नमूद करीत 15 दिवसांत गाळ काढण्याचे निर्देश दिले. नगरसेवक संदीप सहारे यांच्या एका प्रश्‍नावरून आयुक्त अभिजित बांगर यांनी तूर्तास पाणी कपातीची शक्‍यता नसल्याचे नमूद करीत प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी बाकावरील सतीश होले, यशश्री नंदनवार आदींनीही प्रशासनावर तोंडसुख घेतले.

तत्काळ पाणी कपातीची परिस्थिती नाही. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. मात्र, पाणी बचतीसाठी जनजागृती करणार आहे. शहरात नियमित दररोज पाणी मिळत नाही. विरोधकांचे आरोप खोटे आहे. ओसीडब्ल्यूवरील दंडही माफ केला नाही.
- संदीप जोशी, सत्तापक्षनेते.

पालकमंत्र्यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशावरून शहरात पाणी कपातीचे संकेत आहेत. किंबहुना 10 टक्के पाणी कपात होत आहे. कपात केली नसल्याची चुकीची माहिती देण्यात येत आहे. दूषित पाण्याने अनेक भागांतील नागरिक आजारी पडत आहेत. ओसीडब्ल्यूच्या चुकांवर पांघरून घालण्यात येत आहे.
- तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते.

कन्हान येथील पंप तात्पुरते बंद करण्यात आले होते. ती केवळ दोन दिवसांची समस्या होती. त्याला पाणी कपात म्हणता येणार नाही. शहराला सध्या 25 एमएलडी पाणी कमी मिळत असून ते कसे भरून काढायचे याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या शहरात पाणी कपातीची गरज नाही.
- अभिजित बांगर, आयुक्त
.

Web Title: Nagpur water shortage news