दिवसाआड पाणीपुरवठ्याने जलवाहिन्या धोक्‍यात

file photo
file photo

नागपूर : अकरा दिवसांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेच्या या धाडसी निर्णयामुळे जलवाहिन्यांवरच संकट आल्याचे चित्र आहे. दहा दिवसांत सात ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे पाणीपुरवठा बंदच्या दुसऱ्या दिवशी पाणी सोडण्यात येते. नेमक्‍या त्याच दिवशी जलवाहिन्यांना गळती लागत आहे किंवा त्या फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याने प्रशासनापुढे नवे तांत्रिक आव्हान उभे ठाकले आहे.
पावसाने दडी मारल्याने तसेच जलाशये कोरडी झाल्याने महापालिकेने 17 जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूरकरांच्या पाण्याच्या नासाडीची सवय बघता या निर्णयाचे जलतज्ज्ञांनी स्वागत केले. मात्र, या धाडसी निर्णयामुळे नवे संकट प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. महापालिकेने बुधवार, शुक्रवार व रविवारी संपूर्ण शहरात पाणी बंद केले आहे. या आठवड्यात बुधवारी 24 जुलैला शहरात पाणी बंद होते. 25 तारखेला नागपूरकरांना पाणीपुरवठा अपेक्षित होता. परंतु, 24 जुलैच्या रात्री दोन वाजता फुटाळाजवळ लक्ष्मीनगर जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला दोन ते तीन फूट लांबीचे तडे गेले. 25 तारखेला मंगळवारी झोनमध्येही जलवाहिनीला गळती लागली. तत्पूर्वी 23 जुलैला रात्री साडेनऊच्या सुमारास काचीपुरा चौकात जलवाहिनीला गळती लागली. 19 जुलैला शहरात पाणी बंद होते. 20 जुलैला पाणी अपेक्षित असताना लक्ष्मीनगर जलकुंभाची जलवाहिनी दुपारी फुटल्याचे आढळून आले. 18 जुलैला गुरुवारी शहरात पाणी अपेक्षित असताना बस्तरवारी भागात जलवाहिनीला गळती लागली. याबाबत नगरसेविका आभा पांडे यांनी प्रशासनाकडे तक्रारही केली होती. शहरात पाणी बंद असल्याच्या दुसऱ्या दिवशीच जलवाहिन्या फुटत आहेत किंवा गळती लागत आहे. पाणीपुरवठा बंदच्या दिवशी जलकुंभापर्यंतही पाणी पोहोचले जात नाही. संपूर्ण यंत्रणा बंद ठेवली जाते. त्यामुळे जलवाहिन्या पूर्ण कोरड्या असते, परिणामी त्यात पोकळी निर्माण होते. पाणीपुरवठ्याच्या दिवशी जलदगतीने पाणी सोडले जात असल्याने एकाचवेळी निर्माण झालेला दबाव जलवाहिन्यांसाठी धोकादायक ठरत असल्याने तज्ज्ञाने नमूद केले. शहरात ओसीडब्ल्यूने 600 किमीच्या नव्या जलवाहिन्यांचे जाळे टाकले आहे. त्यामुळे संपूर्ण जलवाहिन्यांचे जाळेही धोक्‍यात आल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com