कन्हान नदीत नागपूरचा युवक बुडाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

कामठी (जि. नागपूर) : पावसाळ्याच्या दिवसांत अनेक तरुण छंद म्हणून मासे पकडण्यासाठी पाण्याच्या ठिकाणी जात असतात. परंतु असाच छंद अंगलट आल्याने मासे पकडण्यासाठी गेलेल्या नागपूरच्या एका तरुणाला कन्हान नदीच्या पात्रात बुडून जीव गमवावा लागला. विकास ऊर्फ गोलू नरेश मानकर (28, पंचशीलनगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या पाचपावली राणी दुर्गावती चौक परिसरातील विकास ऊर्फ गोलू नरेश मानकर (28), त्याचे साथीदार सुरेश बेंदाडे, धर्मपाल मेश्राम, अश्विन लाडे, सूरज वानखेडे व सचिन पाटील असे सहा युवक कामठी तालुक्‍यातील गादा शिवारातील (काला फत्तर) कन्हान नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी आले होते. मासे पकडण्याचा छंद पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नदीच्या पाण्यात अंघोळ करण्याची इच्छा झाल्याने हे सर्व पाण्यात अंघोळ करण्याकरिता गेले. अंघोळ करता करता खोल पाण्यात जात असल्याचा भास झाल्याने एकेक करून पाच जण बाहेर पडले. परंतु त्यांचा साथीदार विकास खोल पाण्यात गेल्याने तो बाहेर निघाला नाही. साथीदार बुडाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली, परंतु विकास बुडाल्याने त्याला वाचवू शकले नाहीत. त्यांनी लगेच कामठी पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकलसह पीएसआय राऊत, साखरे चमूसह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तहसीलदारांना घटनेची माहिती दिली व शोधकार्य सुरू केले. काही वेळाने युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता स्थानिक शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविला व त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur youth drowned in Kanhan river