धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती, 'या' दोन आजाराची आढळली लक्षणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

नागपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या (coronavirus) संसर्गाची साखळी जवळपास तुटल्यातच जमा आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाणही घटत असले तरी कोरोनाचा धोका मात्र, पूर्णपणे टळलेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोका (third wave of corona) लहान मुलांना असल्याचा इशारा देण्यात आला असला तरी त्याबाबत ठोस पुरावे नसल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने (central government health department) म्हटले आहे. तथापि, चोरपावलाने शरीरात घुसणाऱ्या कोरोना विषाणुपासून सावध राहणे गरजेचे आहे. कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल)च्या (government medical college nagpur) कोविड वार्डात दहा मुलांना भरती करण्यात आले आहे. या मुलांमध्ये कोरोनाबरोबरच इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणे आढळली आहेत. (10 children admitted to covid ward of government medical college nagpur)

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी सावधानता म्हणून सर्वच रुग्णालयात लहान मुलांसाठी अतिदक्षता विभागासह वॉर्ड तयार करण्याची तयारी सुरू आहे. कोरोनाबाधित वयस्कांमध्ये थकवा, घसा खवखवणे, कोरडा खोकला, श्वसनाशी संबंधित लक्षणांसह शरीरातील ऑक्सिजनची शरीरातील पातळी कमी होत असल्याचे दिसून येते. मात्र, मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांना वेगळ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. कोरोनामुळे मुले शॉकमध्ये येतात. तसेच दाखल झालेली संक्रमित बहुतेक मुले बेशुद्धावस्थेत असतात. अशा मुलांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो. अशा मुलांना सामान्य करण्याचे आव्हान पेलवत त्यांच्यावर सद्या उपचार सुरू आहेत.

अतिसार, टायफाईडचे रुग्ण वाढताहेत -

मेडिकलमध्ये कोविड वॉर्डात सध्या दहा मुले दाखल आहेत. ज्यामध्ये ५ महिन्यांपासून ते १२ वर्षांपर्यंतची मुले आहेत. या रुग्णांमध्ये मल्टिसिस्टम इन्फ्रामेट्री सिंड्रोम असलेली मुलं देखील आहेत. याशिवाय मेडिकलमधील बाह्यरुग्ण विभागात अतिसार, टायफॉईड, सर्दी आणि डेंगीच्या संशय असलेले बालरुग्ण येत आहेत. त्यामध्ये अतिसाराचे रुग्ण अधिक असतात. मुलांमध्ये मल्टिसिस्टम इन्फ्रामेट्री सिंड्रोम (एमआयएससी) आजारामध्ये बहुधा डेंगीच्या आजारासारखी लक्षणे आढळतात. यात, मुलांना ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, डोकेदुखी होणे, हात किंवा पाय सुजणे यासारखे लक्षणे जाणवत आहेत. या मुलांमध्ये एमआयएससी रोग ओळखणे कठीण आहे.

सध्या १० संक्रमित मुलांना दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही एमआयएससीचे रुग्णही आहेत. या रूग्णांमधील बहुतेक समस्या म्हणजे ओटीपोटात वेदना, सूज येणे, ताप येणे अशी लक्षणे आहेत. सामान्य ओपीडीमध्ये अतिसाराचे रुग्ण अधिक असतात. कोविडमध्ये मुले शॉकमध्ये असल्याचे आढळून येते.
-डॉ. दीप्ती जैन, विभागप्रमुख, बालरोग विभाग, मेडिकल.
टॅग्स :CoronavirusNagpur