प्रवाहाच्या विरोधात पोहून घेतली गरुडझेप

१२ वर्षीय टेबल टेनिसपटू इक्षिका उमाटेचा प्रेरणादायी संघर्ष
Ikshika Umate
Ikshika UmateSakal

नागपूर - ‘लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है, पर असली इंसान वो है, जो लहरों को चिरकर आगे बढ़ता है’ एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील हा लोकप्रिय डायलॉग नागपूरची उदयोन्मुख महिला टेबल टेनिसपटू इक्षिका उमाटेच्या बाबतीत तंतोतंत लागू होतो. विविध कारणांमुळे उपराजधानीत टेबल टेनिसचा खेळ काहीसा मागे पडला आहे. ‘मोटिव्हेशन’ नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात खेळाडू पुढे येत नसल्याचे निराशाजनक चित्र दिसून येते. मात्र, या परिस्थितीतही इक्षिकाने टेबल टेनिसमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेत राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून आपला ठसा उमटविला.

१२ वर्षांच्या इक्षिकाने इंदूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलींच्या गटात रौप्यपदक जिंकले. याच स्पर्धेत १५ वर्षांखालील गटातही तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. इक्षिकाची ही कामगिरी तिच्या पुढील कारकिर्दीसाठी तर फायदेशीर आहेच, शिवाय इतरही खेळाडूंना प्रोत्साहन देणारी आहे. एकेकाळी नागपूर शहरात टेबल टेनिसचा प्रचंड माहोल होता. मल्लिका भांडारकरसह अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊन उपराजधानीला नावलौकिक मिळवून दिला. आजच्या घडीला सबज्युनिअर व ज्युनिअर स्तरावर थोडेफार खेळाडू मिळतीलही; पण सीनियर गटात पूर्णपणे दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर इक्षिकाचे हे यश निश्चितच नागपूरच्या टेबल टेनिसला नवे बळ व उभारी देणारे आहे.

चार वर्षांत अनेक ‘टायटल्स’

वयाच्या आठव्या वर्षी टेबल टेनिसमध्ये पाऊल ठेवणाऱ्या इक्षिकाने अल्पावधीतच आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिने यशाचे एकेक शिखर गाठत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. इंदूरमधील रौप्यपदक आणि गतवर्षी पुद्दुचेरी येथील राष्ट्रीय स्पर्धेतील ब्रॉंझपदक तिची आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे.

आई-वडिलांनी दिले प्रोत्साहन

इक्षिकाचे वडील (प्रणय) स्वतः उमेदीच्या काळात दर्जेदार बॅडमिंटन खेळाडू राहिले आहेत. तर आई (स्वाती) एलआयसी हाऊसिंगमध्ये जॉब करते. दोघांनीही आपापली ड्यूटी सांभाळत लेकीचे क्रीडाप्रेम जपले. तिला सतत प्रोत्साहन दिले.

ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न

अजय कांबळे यांच्या तालमीत घडलेल्या व सध्या मंगेश मोपकर यांच्या मार्गदर्शनात सराव करणाऱ्या इक्षिकाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विशेषतः ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी इक्षिका गेल्या चार-पाच महिन्यांपासून पुणे येथे आधुनिक प्रशिक्षण व कठोर मेहनत घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com