esakal | बापरे! नागपुरात सप्टेंबरमध्ये ‘कोरोना हिट'; पहिल्या ४ दिवसांत तब्बल इतके कोरोनाबळी; वाचा आजची आकडेवारी 
sakal

बोलून बातमी शोधा

175 peoplepassed away due to corona in nagpur

विविध लॅबमधून आलेला तपासणी अहवाल व ॲन्टीजिन टेस्टमधून १९६६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. एकाच दिवसांत एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून आल्याची ही पहिलीच वेळ आहे.

बापरे! नागपुरात सप्टेंबरमध्ये ‘कोरोना हिट'; पहिल्या ४ दिवसांत तब्बल इतके कोरोनाबळी; वाचा आजची आकडेवारी 

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर :  आयएमसीआर व इतरही संस्थांनी सप्टेंबरमध्ये कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याचे केलेले भाकित गेल्या चार दिवसांतील पावणे दोनशे कोरोनाबळींमुळे खरे होताना दिसत आहे. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले ३९ कोरोनाबाधित शुक्रवारी दगावले असून सप्टेंबरमधील पहिल्या चार दिवसांत कोरोनाबळींची संख्या १७१ झाली. कोरोनाबळींचा एकूण आलेख १२१६ पर्यंत गेला असून महापालिका, आरोग्य विभागापुढे मृत्यूसत्र रोखण्याचे मोठे आव्हान उभे झाले आहे. 

दरम्यान, विविध लॅबमधून आलेला तपासणी अहवाल व ॲन्टीजिन टेस्टमधून १९६६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. एकाच दिवसांत एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून आल्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाबळींची वाढत्या संख्येने शहरवासींत भीतीचे तर प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठ दिवसांत शहरात २७० जण कोरोनाचे बळी ठरले असून यातील १७१ मागील चार दिवसांतील आहेत. 

हेही वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

आज ३९ जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. यात ३३ शहरातील तर ५ ग्रामीणमधील असून एक जण जिल्ह्याबाहेरील आहे. या मृत्यूंसह कोरोनाबळींच्या संख्येने बाराशेचा आकडा पार केला. यात केवळ शहरातील ९२८ जणांचा समावेश आहे. कोरोनाबळींची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका, आरोग्य विभागाकडून विविध उपाय केले जात आहे. परंतु वाढत्या कोरोनाबळींच्या संख्येने त्यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

कोरोनाबळीमुळे चिंतेत असलेल्या प्रशासनाला कोरोनाग्रस्तांच्या लाटेनेही निराश केले. महापालिकेने कोरोनाग्रस्तांना तातडीने उपचार मिळावे, या हेतूने चाचणी केंद्रांची संख्या वाढविली. त्यामुळे चाचणी केंद्रांवर रांगा लागल्या असून बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शुक्रवारी विविध लॅबमधील अहवाल तसेच ॲटिजिन टेस्टमधून १९६६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. 

यात शहरातील १७५६ तर ग्रामीणमधील २०९ जणांचा समावेश आहे. नव्या चाचणी अहवालांसह कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ हजार ३९८ पर्यंत पोहोचली. यात शहरातील २८ हजार ६६५ जणांचा समावेश असून ग्रामीणमधील ७४३७ जण आहेत. जिल्ह्यात आज ८ हजार १५९ जणांची चाचणी करण्यात आली. यासह आतापर्यंत २ लाख ८२ हजार ६३३ जणांची चाचणी करण्यात आली.

अधिक माहितीसाठी - सुमितचा गणेश देखावा ठरला अव्वल! यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा

आठवड्याभरात दहा हजार बाधित

कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या आठवड्याभरात दहा हजाराने वाढली आहे. मागील शुक्रवारी (२८ ऑगस्ट) शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ हजार ९४ होती. आज कोरोनाबाधितांचा आलेख ३९ हजार ३९८ वर पोहोचला. आठवड्याभरात २७० कोरोनाबळींची भर पडली. मागील शुक्रवारी एकूण कोरोनाबळी ९४६ होते.

२४ हजारांवर बाधित कोरोनामुक्त

शुक्रवारी कोरोनावर मात करून १२२८ जण घरी परतले. यात शहरातील १०२७ तर ग्रामीणमधील २०१ जणांचा समावेश आहे. आज घरी परतलेल्यांसह आतापर्यंत २४ हजार ११० जण कोरोनामुक्त झाले. सध्या ११ हजार ७२ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. यातील ६ हजार ३१७ जण घरीच उपचार घेत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image