esakal | विदर्भात २१ वीज कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू; आतापर्यंत १३१७ कर्मचाऱ्यांना बाधा

बोलून बातमी शोधा

corona
विदर्भात २१ वीज कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू; आतापर्यंत १३१७ कर्मचाऱ्यांना बाधा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः अखंडित वीजपुरवठ्यासाठी राबणाऱे वीजकर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. महावितरणच्या विदर्भातील १ हजार ३१६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून २१ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: लसीकरणानंतरही मृत्यू? ग्रामीण भागातील धक्कादायक प्रकार; प्रशासनाचे मात्र कानावर हात

कोरोना संकटाच्या वर्षभराच्या काळात १ हजार ३१७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना संसर्गाचा सामना करावा लागला. त्यातील ६५९ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सद्यःस्थितीत ६३७ कर्मचारी रुग्णालय किंवा गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट सर्व वयोगटासाठी धोकादायक ठरली आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच ग्राहकसेवेचे कर्तव्य बजावताना आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे.

नागपूर प्रादेशिक विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. येत्या १५ दिवसांत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी कार्यालयप्रमुख व मानव संसाधन अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले आहे.

कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रंगारी यांनी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागातील १२ कर्मचारी संघटनांच्या ४५ पदाधिकाऱ्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोना पासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, हातांची नियमित स्वच्छता आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीसह आता चौथे सूत्र म्हणू नियमित वाफ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: नागपूर झाले नरकपूर! लोकप्रतिनिधींच्या केवळ घोषणाच; पालिका प्रशासन आणि महापौरांत समन्वयच नाही

सुरक्षितपणे मान्सूनपूर्व कामे उरका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत असतानाच पावसात अखंडित वीजपुरवठ्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे आटोपून घेणे क्रमप्राप्त आहे. मॉन्सून दाखल होण्यापूर्वी वादळी पाऊस हजेरी लावत असल्याचा अनुभव आहे. यामुळे परिस्थिती खडतर असली तरी नागरिकांच्या सुविधेसाठी कामे पूर्ण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करीत देखभाल दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश सुहास रंगारी यांनी दिले.

संपादन - अथर्व महांकाळ