esakal | Remdesivir: काळाबाजार करणाऱ्या न्यूरॉनच्या कर्मचाऱ्यासह आणखी तिघांना अटक

बोलून बातमी शोधा

remdesivir
Remdesivir: काळाबाजार करणाऱ्या न्यूरॉनच्या कर्मचाऱ्यासह आणखी तिघांना अटक
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः कोरोना रुग्णांना देण्यात येणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता अनेकांनी ब्लॅक मार्केटिंग करणे सुरू केले आहे. काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अनेक मोठमोठ्‍या हॉस्पिटलमधील कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. अशाच काळाबाजार करणाऱ्या न्यूरॉन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यासह तीन आरोपींना मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास पोलिस उपायुक्त परिमंडळ क्र.चारच्या पोलिस पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन, मोबाईल व आयफोन असा एकूण ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा: 'आम्ही ऑक्‍सिजन देणार नाही, तुमची सोय तुम्हीच करा'; जिल्हा प्रशासनाची खासगी रुग्णालयांना अट

शुभम संजय पानतावणे (२४, रामदासपेठ, मेडिट्रीना हॉस्पिटल मागे), प्रणय दिनकरराव येरपुडे (२१, रा. संघ बिल्डींग, धर्माधिकारी लाईन, महाल), मनमोहन नरेश मदान (२१, रा. डॉ. जामदार गल्ली, संघ बिल्डींगजवळ, महाल) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हा न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आहे. प्रणय व मनमोहन हे बीबीएचे शिक्षण घेत आहेत.

एका तरुणीला रेमडेसिव्हिरची गरज होती .तिने प्रणय याच्याशी संपर्क साधला . प्रणय याने एका औषध विक्रेत्याकडे विचारणा केली. त्याने प्रणय याला शुभम याचा मोबाइल क्रमांक दिला. प्रणयने शुभम याच्याशी संपर्क साधला. ३० हजार रुपयांमध्ये रेमडेसिव्हिर देतो,असे शुभम हा प्रणय याला म्हणाला. शुभम याने प्रणयला जनता चौकात बोलाविले. दरम्यान या काळाबाजाराची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांना मिळाली. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, हेडकॉन्स्टेबल अजय यादव, चंद्रशेखर फिस्के, शिपाई सचिन चौधरी यांनी जनता चौकात सापळा रचला.

प्रणय व त्याचा मित्र मनमोहन जनता चौकात आले. प्रणय याने शुभम याच्याकडून इंजेक्शन घेताच पोलिसांनी तिघांना पकडले.त्यांच्याकडून दोन रेमडेसिव्हिर, दोन मोबाइलसह ८७ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. तिघांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलिसांनी तिघांनाही बुधवारी अवकाशकालीन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

आतापर्यंत १७ जणांवर गुन्हे

जरीपटका, वाठोडा, सक्करदरा आणि सीताबर्डी या पोलिस स्टेशनच्या हद्दीत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये एका नर्सचा आणि दोन एक्स रे टेक्निशियन तर महाराष्ट्र न्यूज सेव्हन या वेबपोर्टलच्या पत्रकाराचा समावेश आहे.

हेही वाचा: पोलिसांनी मोडले नियम म्हणूनच वाचले 'त्या' १५ जणांचे प्राण; दबंगगिरी दाखवत आणलं ऑक्सिजन

बनावट इंजेक्शन ः आणखी एक गजाआड

सक्करदरा परिसरात रिकाम्या बाटल्यांमध्ये पाणी भरून विक्री केल्याप्रकरणात सक्करदरा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. सुमित मनोहरे (वय ३५ मनोहरे रा. पिपंळपूर, चांदूरबाजार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी अनिकेत नंदेश्वर व अभिलाष देवरावजी पेटकर या दोघांना अटक केली होती. दोघांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सुमित याला अटक केली. सुमित याने यापूर्वीही ३० हजार रुपयांमध्ये इंजेक्शन विकल्याचे कळते. सक्करदरा पोलिसांनी तिघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. सुमित हा चालक आहे.