esakal | १० तासांमध्ये ३५ जणांना मिळाल्या खाटा, गरिबांना दाखविला जात होता बाहेरचा रस्ता

बोलून बातमी शोधा

only important surgery in gmc nagpur
१० तासांमध्ये ३५ जणांना मिळाल्या खाटा, गरिबांना दाखविला जात होता बाहेरचा रस्ता
sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : गोरगरीब रुग्णांचा एकमेव आधार असलेल्या मेडिकलमध्ये ओळखीच्या रुग्णांना तत्काळ खाट उपलब्ध होत असल्याचा गंभीर आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत होता. दिवसाला १० खाटादेखील गरिबांना मिळत नव्हत्या. आरोग्याच्या बाबतीत होत असलेला हा भेदभाव 'सकाळ'ने पुढे आणला. लगेच रविवारी सुटी असूनही १० तासांमध्ये ३५ पेक्षा अधिक रुग्णांना खाटा मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. पुढे १२ तासांमध्ये अधिक खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या.

हेही वाचा: कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले लाखनीचे युवक; ऑक्‍सिजन सिलिंडरची केली व्यवस्था

अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी सकाळमध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत संबंधित सीएमओला धारेवर धरले. खाटेच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना रीतसर खाट उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे फर्मान जारी केले. खाटा मिळाल्याने अनेक नातेवाइकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. गरीब रुग्णांना बाहेरची वाट दाखवू नका, अशी विनवणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून वारंवार होत होती.

मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या कोरोनाबाधितांना योग्य सल्ला मिळत नाही. यामुळे सारे बाधित येथील आवारात सैरभर फिरतात. ट्रॉमा युनिटमधील कोविड रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात निवडक मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी चालत असून रुग्णांसह नातेवाइकांना उपेक्षेची वागणूक देत असल्याचे वृत्त सकाळने मांडले. विशेष असे की, एका गरीब रुग्णासाठी अधिष्ठाता आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचा संवाद झाल्यानंतरही उर्मटपणे त्या रुग्णाला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम येथील डॉ. संतोष या सीएमओ केल्याचे उजेडात आणले.

सकाळमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी दखल घेत तत्काळ सीएमओची बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीनंतर मात्र रुग्णांना बिनदिक्कत खाटा उपलब्ध झाल्या. यानंतर २४ तासांमध्ये प्रतीक्षेत असलेल्यांना खाटा मिळाल्याचे सांगण्यात आले.