esakal | नागपुरात भयावह स्थिती, एकाच दिवशी ५१ मृत्यू, बाराशेवर बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

51 deaths in a single day due to corona in Nagpur

नागपुरात कोरोनाचे मृत्यू थांबत नसल्यामुळे भयावह वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आज झालेल्या ५१ मृत्यूंमध्ये ३६ मृत्यू शहरातील आहेत. यामुळे शहरात आतापर्यंत झालेल्या मृत्यूचा आकडा १६३९ वर पोहचला आहे. तर नव्याने ७ मृत्यूची भर पडल्याने ग्रामीण भागात ३६१ जण दगावल्याची नोंद झाली आहे.

नागपुरात भयावह स्थिती, एकाच दिवशी ५१ मृत्यू, बाराशेवर बाधित

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर  ः मागील २४ तासांमध्ये मेडिकल, मेयोसह खासगी रुग्णालयात भरती असलेल्या ५१ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपराजधानीत सलग चौथ्या दिवशी कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्ती आकडा फुगलेला आहे. १२९१ जणांना कोरोनाची बाधा झाली तर १३५७ जणांनी कोरोनावर मात केली. बाधितांचा आकडा ६७ हजार ७७१ वर पोचला असला तरी ५१ हजार ९१२ जणांनी कोरोनाला हरवले आहे.

नागपुरात कोरोनाचे मृत्यू थांबत नसल्यामुळे भयावह वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आज झालेल्या ५१ मृत्यूंमध्ये ३६ मृत्यू शहरातील आहेत. यामुळे शहरात आतापर्यंत झालेल्या मृत्यूचा आकडा १६३९ वर पोहचला आहे. तर नव्याने ७ मृत्यूची भर पडल्याने ग्रामीण भागात ३६१ जण दगावल्याची नोंद झाली आहे. ८ जण नागपूर जिल्ह्याबाहेरचे आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून प्राप्त झाली आहे. 

जाणून घ्या - सत्तावीस वर्षीय युवक स्मशानघाटासमोरून गाडी ढकलत घेऊन जात होता, पुढे...
 

दर दिवसाला होणाऱ्या चाचण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा खाली येत आहे. ही धोक्याची घंटा आहे. मेयो,मेडिकलमध्ये होणाऱ्या चाचण्यांमध्ये घट झाल्यामुळे बाधितांचा आकडा कमी दिसत आहे. नागपुरात पूर्वी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढलेली होती. मात्र रॅपिड ॲन्टेजन चाचणी सुरू झाल्यानंतर आरटी पीसीआर चाचण्यांच्या आकडेवारीत कमालीची घट झाली आहे. 

बुधवारी नागपुरात ३ हजार ७९ रॅपिड ॲन्टिजन चाचण्या झाल्या आहेत. तर १६९७ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत.मागील चार दिवसांमध्ये नागपुरात ५ हजार १४० बाधित आढळले तर ६ हजार ६२३ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

चाचण्यांमध्येही घोळ

शहरातील प्रयोगशाळेनिहाय आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ६२६९ अशी नोंदविली आहे. यातील १२९१ जण बाधित आल्याची तर ४ हजार९७८ जण निगेटिव्ह असल्याची नोंद केली आहे. तर दुसरीकडे प्रयोगशाळेमध्ये झालेल्या चाचण्यांची संख्या ४४७६ दाखवण्यात आली आहे. यामुळे हा घोळ कायमच सुरू आहे. विशेष असे की, नागपुरात १६५०० कोरोनाबाधित उपचाराखाली असल्याची नोंद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने केली आहे. मंगळवारी कोरोनामुक्तांचा आकडा ५५ हजारावर दाखवण्यात आला होता, मात्र बुधवारी कोरोनामुक्तांमध्ये कपात करून हा आकडा ५१ हजार ९१२ वर आणला आहे. यामुळे कोरोनामुक्तीचा दर ८३ वरून ७६ वर आला आहे.

जिल्ह्यात १६ हजार ५९३ बाधित

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेल्या नोंदीनुसार नागपूर जिल्ह्यामध्ये१६ हजार ५९३ कोरोनाबाधित आहेत. यात ग्रामीण भागातील ३ हजार २२३ रुग्ण आहेत. तर नागपूर शहरातील १३ हजार ३७० रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष असे की, यात गृहविलगीकरणात असलेले रुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे नव्याने आकडेवारीत घोळ झाला असल्याची जोरदार चर्चा येथे पसरली आहे. 

संपादन : अतुल मांगे

loading image
go to top