महागाईने घोटला पोल्ट्रीचा गळा, 70 टक्के फॉर्म बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

poultry farming

महागाईने घोटला पोल्ट्रीचा गळा, 70 टक्के फॉर्म बंद

नागपूर : उत्पादन खर्चासह इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७० टक्के कुक्कुटपालन व्यवसाय (poultry farm business) ठप्प झाला आहे. ९० रुपये प्रति किलो विकल्या जाणाऱ्या कोंबडीचा खर्चच दरवाढीने ११० रुपयावर गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ‘चार आण्याची कोंबडी, खर्च बारा आणे’ अशी या व्यवसायाची स्थिती झाली. कोंबडीच्या खाद्यदरात गेल्या तीन महिन्यात तिप्पटीने वाढ झाल्याने व्यवसायिक आणि ग्राहक यांचे कंबरडे मोडले आहे. (70 percent poultry closed due to inflation in nagpur)

हेही वाचा: म्युकरमायकोसिस रुग्ण वाढणार? काय म्हणातात वैद्यकीय तज्ज्ञ

शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेला कुक्कुटपालन व्यवसाय आता अडचणीत आला आहे. जिल्ह्यात अंदाजे ७०० पेक्षा अधिक लहान मोठे पोल्ट्री फॉर्म आहेत. चार ते पाच हजार लोकांना रोजगार मिळतो. मात्र, गेल्या तीन महिन्यात अचानकच सोयाबीनच्या खाद्यांच्या दरात तिप्पट वाढ झाली. लहान पिल्ले आणि मोठ्या पक्ष्यांचे आवडते खाद्य सोयाबीन आहे. त्यात अचानकच तिप्पट वाढ झाल्याने हा व्यवसायाला घरघर लागली आहे. कोंबडी ३५ दिवसात विक्रीसाठी तयार होते. या पाच आठवड्यात एक पक्षी साडे तीन किलो खाद्य सेवन करते. त्यात ९०० ग्रॅम सोयाबीनच्या खाद्याचा समावेश असतो.

चारशेहून अधिक फार्म बंद -

जिल्ह्यात ७०० पालन केंद्र आहेत. त्यापैकी ४०० पेक्षा अधिक बंद पडले आहेत. परिणामी त्यात काम करणाऱ्यांचा रोजगार तर बुडालाच पण चिकनचे भावही वाढले आहेत. याची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे.

उत्पन्न अर्ध्यावरच -

एक कोंबडी ३५ दिवसात विक्रीसाठी तयार होते. एका सिझनमध्ये जिल्ह्यात दहा लाख कोंबड्या तयार व्हायच्या. आता केवळ पाच लाखांच्या आसपासच कोंबड्या पूर्णपणे विकसित होत आहेत. यामुळे या व्यवसायात उतरलेल्यांचे कंबरडेच मोडले.

उधारी बंद -

वाढलेल्या खाद्याच्या दराने कुक्कूटपालकाकडील खेळते भांडवल कमी झाले आहे. टाळेबंदीमुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आल्याने व्यापारी उधारीत खाद्य देण्यास तयार नाही. कारण उधारीत दिलेल्या खाद्याचे पैसै मिळेल की नाही ? अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे.

खाद्याचे भाव फेब्रुवारी जुलै

  • सोयाबीन : ३० रुपये - ११० रुपये

  • कोंबडी खाद्य : २५ रुपये - ५० रुपये

उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कोंबडी विकावी लागत असल्याने कुक्कुटपालक हवालदिल झालेला आहे. त्यामुळे अनेकांनी कुक्कुटपालन करणे बंद केले आहे तर काहींनी भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिले आहेत. -
सुधीर दुद्दलवार, पोल्ट्री व्यावसायिक.
कोंबडीच्या खाद्याचे दर वाढल्याने कुक्कुट पालन बंद केले आहे. कोरोनाच्या फटक्यानंतर आता दर वाढीमुळे हा निर्णय घेतला आहे. अचानक झालेली दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे.
-स्वप्नील चौधरी, कुकुटपालक शेतकरी
वाढलेली महागाई आणि उत्पादन शुल्कात मेळ बसत नसल्याने अनेक पोल्ट्री फॉर्मर्स अडचणीत आलेले आहेत. पुढे श्रावण महिना असून त्यात कोंबड्याचे भाव अजून कमी होणार आहे. त्यामुळेच अनेकांनी व्यवसाय बंद केले आहे.
-डॉ. राजा दुधबळे, अध्यक्ष, विदर्भ पोल्ट्री फॉर्मर असोसिएशन

Web Title: 70 Percent Poultry Closed Due To Inflation In Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur