'मी माझं आयुष्य जगलो', ८५ वर्षीय आजोबाने दिला तरुणाला बेड अन् स्वतः पत्करले मरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narayan dabhadkar

'मी माझं आयुष्य जगलो', ८५ वर्षीय आजोबाने दिला तरुणाला बेड अन् स्वतः पत्करले मरण

नागपूर : इतरांच्या मदतीला धावून जाणे ही भारतीयांना संस्कारातून मिळालेली देणगी आहे. परंतु, मृत्यू जवळ आलेला असताना इतरांना प्राधान्य देणारे व्यक्ती आजच्या युगात मोजकेच आहेत. अशीच एक घटना पुढे आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ८५ वर्षीय स्वयंसेवकाने रुग्णालयात मिळालेली खाट तरुण रुग्णाला दिली.

सावित्री विहार, वर्धा रोड, नागपूर येथील रहिवासी असलेले नारायणराव दाभाडकर मोदी नंबर ३, सीताबर्डी येथील शाखेचे स्वयंसेवक. त्यांनी दाखवलेली उदारता आज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची मुलगी आसावरी कोठीवान यांनी काही दिवस प्रयत्न केल्यानंतर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये खाटेची व्यवस्था झाली. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना श्‍वास घेण्यासाठी खूप त्रास होत होता. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण करीत असताना त्यांचे लक्ष एका रडणाऱ्या महिलेकडे गेले. विनवणी करीत ती आपल्या कोरोनाबाधित पतीला खाट मिळावी म्हणून टाहो फोडत होती. तिच्या ४० वर्षीय पतीला ताबडतोब ऑक्सिजन मिळणे गरजेचे होते. नारायण दाभाडकर यांनी वेळ न घालवता आपल्याला मिळालेली खाट त्या गरजू व्यक्तीला देण्याची विनंती तेथील परिचारिकेला केली. 'मी माझे जीवन जगलो आहे. खाट उपलब्ध असल्यास या महिलेच्या पतीला उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या परिवाराला त्यांची गरज आहे', असेही ते म्हणाले.

तीन दिवसात त्यागले प्राण -

नारायण दाभाडकर यांनी घेतलेल्या निर्णयावर त्यांच्या जावयांनी आणि डॉक्टरांनी त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपल्या लेकीला फोन लावत घरी येत असल्याची माहिती दिली. रुग्णालयाने हमीपत्रावर स्वाक्षरी घेत त्या रुग्णाला खाट दिली. तीन दिवसांनंतर नारायण दाभाडकर यांचे निधन झाले. शासनाच्या सांख्यिकी विभागाचे ते माजी कर्मचारी होते.

टॅग्स :CoronavirusNagpurNagpur