esakal | Animal Protection Day : शासनाचे दुर्लक्ष, मानवाच्या स्वार्थीवृत्तीमुळे प्राण्यांना मोठा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक प्राणी सुरक्षा दिन

शासनाचे दुर्लक्ष, मानवाच्या स्वार्थीवृत्तीमुळे प्राण्यांना धोका

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : ‘प्राण्यांचे संरक्षण करा’, ‘पर्यावरणाचे संरक्षण करा’, ‘प्राण्यांचे संरक्षण करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, असे आपण नेहमीच ऐकत असतो. शासन-प्रशासन सुद्धा कागदोपत्री या गोष्टींचे अनुसरण करते. प्रत्यक्षात प्राण्यांच्या हिताचा, सुरक्षिततेचा, संवर्धनाचा विषय नेहमीच दुर्लक्षित केला जातो. पर्यावरणाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयाला उचित प्राधान्य न देता उपाययोजना केली जात नाही. यामुळेच की काय मानव सर्व प्रकारच्या प्राण्यांशी क्रुरतेने वागत आहे. वन्यप्राणी असो अथवा रस्त्यांवर वास्तव्य करणारे प्राणी त्यांना कायद्याने संरक्षण प्राप्त आहे. पशुपक्ष्यांची काळजी घेणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. याची जाणीव प्रत्येकाला व्हावी म्हणूनच ‘जागतिक प्राणी सुरक्षा दिन’ जगभर साजरा केला जातो.

शहराच्या आधुनिकीकरणाबरोबर शासनाने-प्रशासनाने प्राणी कल्याणाच्या विषयाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. प्राण्यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी कायदे अस्तित्वात आहेत; मात्र, अमलात आणण्याची दखल घेतली जात नाही. मानवाच्या स्वार्थीवृत्तीमुळे जागतिक स्तरावर प्राणी जीवनाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. प्राण्यांचे जीवन सुरक्षित व्हावे यासाठी शासन-प्रशासनाने पशुप्रेमींना हाताशी धरून विविध उपाययोजनांवर कार्य करायला हवे.

हेही वाचा: सहा वर्षीय मुलाचे अपहरण; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

चार ते पाच वर्षांत मानवाच्या चुकीमुळे रस्ते अपघातात १३,८८८ प्राणी जखमी झाले आहेत. ही संख्या अधिक देखील असू शकते. या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने गुरे, श्वान, मांजरी, गाढव, डुक्कर यांचा अधिक समावेश आहे. जखमी प्राण्यांपैकी किती प्राण्यांना वाचविले या आकडेवारीत तफावत आहे. प्राण्यांसोबत होणाऱ्या दुर्घटना टाळता याव्या, विविध उपाययोजना करण्यात याव्या यासाठी सरकारने पशुहितार्थ कोणतेही पाऊल उचलले नाही.

शासनाने द्यावे याकडे लक्ष

नागरिकांच्या सुख-सोईसाठी वाहतूक सुलभ व्हावी म्हणून शासन-प्रशासन वाहतुकीसाठी रस्ते तयार करतात. वाहनांच्या वेगाची मर्यादा देखील ठरवली आहे. मात्र, वाहनांचा वेग कमी होत नाही, ही बाब वेगळी. रस्ते अपघातात व्यक्ती जखमी झाल्यास लगेच रुग्णवाहिका येते व मदतीसाठी लोकांची गर्दी होते. परंतु, प्राणी जखमी झाल्यास मदतीसाठी कोणीही समोर येत नाही. प्राण्यांचा रस्त्यावरच तडफडून मृत्यू होतो. तेव्हा नागरिकांनी सुद्धा प्राण्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.

हेही वाचा: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला सुरुवात

पशू रुग्णवाहिकेची सोय केव्हा?

शहर व ग्रामीण भागातील रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या, आजारी स्थितीत असणाऱ्या प्राण्यांच्या रेस्क्युसाठी अनेक वर्ष उलटून देखील शासनाने, पशुसंवर्धन विभागाने अद्यापही पशू रुग्णवाहिकेची सोय केलेली नाही. शहरी व ग्रामीण स्तरावर पशुनिवारा केंद्र स्थापन केलेले नाही. मोकाट प्राण्यांवर त्वरित उपचार व्हावे म्हणून २४ तास सुरू असणारे रुग्णालय स्थापन करणे अत्यावश्यक आहे. मात्र, असे होत नसल्याने मोकाट प्राण्यांच्या अधिकारांचे हनन होत आहे. शिवाय पशुप्रेमींच्या भावना दुखावल्या जात आहे.

प्राण्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने हे करावे

  • प्राण्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नसबंदी अभियान मोठ्या स्तरावर राबवायला हवे

  • रेबीज लसीकरण कार्यक्रम मोठ्या स्तरावर राबविला पाहिजे

  • अंधारात प्राण्यांचा जीव जाऊ नये यासाठी गळ्यात रेडियम बेल्ट लावावा

  • पाळीव व जंगली प्राणी यांच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या कायद्याविषयी जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणावर राबवावे

  • प्राण्यांची हत्या किंवा छळ करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी

  • झुडपी जंगलात ले-आऊटला मंजुरी देण्याअगोदर प्राण्यांचे ‘बोमा कॅप्चर’ पद्धतीने स्थलांतर करावे

मध्यप्रदेश पेंचच्या जंगली भागातील महामार्गावर जंगली प्राण्यांच्या अवागमनासाठी नॅशनल हायवे ॲथोरटी ऑफ इंडियाने (NHAI) १४ अंडरपास तयार केले आहेत. रस्ता ओलांडणाऱ्या प्राण्यांना वाहनाच्या आवाजाची समस्या जाणवू नये म्हणून ध्वनिरोधक स्टील बॅरिअर्स लावले आहे. यामुळे या भागात वन्यप्राण्यांच्या मृत्यूत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ एक-दोन महामार्गावर असे प्रयोग करून चालणार नाही तर प्रत्येक जंगली भागातील महामार्गांवर असे अंडरपास तयार व्हायला पाहिजे.
- स्वप्निल बोधाने, प्राणी मित्र, नागपूर
loading image
go to top