esakal | 'X ray'मध्ये मोठा संसर्ग, सीटी व्हॅल्यू १३; तरीही ३२ दिवस संघर्ष करत केली कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

khorgade
'X ray'मध्ये मोठा संसर्ग, सीटी व्हॅल्यू १३; तरीही ३२ दिवस संघर्ष करत केली कोरोनावर मात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रुग्णसेवा करता करता अचानक एकेदिवशी त्याला कोरोनाची बाधा झाली. तब्येत दिवसेंदिवस खालावत गेल्याने ऑक्सिजन लागले; आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती, योग्य उपचार, डॉक्टरांचे शर्थीच्या प्रयत्नांनंतर ३२ दिवसांनी तो मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत बाहेर आला.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

ही प्रेरणादायी व तेवढीच संघर्षपूर्ण कहाणी आहे मेयो हॉस्पिटलमध्ये पुरुष अधिपरिचारक असलेल्या ३१ वर्षीय अंकुश खोरगडेची. त्याची कोविड वॉर्डात ड्यूटी सुरू होती. एकेदिवशी ड्यूटीवरून घरी परतल्यानंतर त्याला थंडी वाजून ताप आला. खोकला, डोके व अंग दुखायला लागले. कोरोनाची शंका आल्याने त्याने चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता लगेच बॅग भरून त्याने स्वतःच गाडी चालवत थेट मेयो गाठले. विविध तपासण्या झाल्यानंतर सामान्य वार्डात उपचार सुरू होत नाही तोच प्रकृती खालावत गेली. ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती. सिटी व्हॅल्यूही १३ पर्यंत आली. शिवाय एक्सरे मध्ये खूप जास्त इन्फेक्शन होतं. अंकुश म्हणाला, त्यावेळची माझी गंभीर अवस्था पाहून मला तातडीने आयसीयूमध्ये हलविण्यात आले. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर लागले. रेमेडेसिव्हिरसुद्धा द्यावे लागले. न्यूमोनिया झाल्याने व अशक्तपणा आल्याने मी वाचेल अशी कुणालाही अपेक्षा नव्हती. मात्र, डॉ. मृणाल हरदास, डॉ. राखी जोशी, डॉ. शेलगावकर, डॉ.मुंजे यांची टीम व सर्व नर्सिंग स्टाफने दिवसरात्र मेहनत घेऊन मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

हेही वाचा: नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ४ लाख पार; आज नव्या ७,४९६ रुग्णांची भर

अंकुश म्हणाला, तब्बल ३२ दिवस जीवनमृत्यूशी झालेला तो संघर्ष माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. मात्र, त्या काळात मी अजिबात 'पॅनिक' झालो नाही. हिंमत हारलो नाही, शेवटपर्यंत 'पॉझिटिव्ह' राहिलो. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायचीच असा निर्धार केला होता. डॉक्टर्स व माझ्या इतर सहकाऱ्यांनीही मला सतत 'मोटिव्हेट' केले. घाबरून न जाता सकारात्मक राहून सामना केल्यास कुणीही कोरोनाला सहजरित्या हरवू शकतो, हे मी महिनाभराच्या या अनुभवातून शिकलो. चांगलं काम व प्रामाणिकपणे रुग्णसेवा केल्याचे हे फळ होते. लक्षणे आढळून आल्यानंतर त्वरित चाचणी व योग्य उपचार करून घ्यावा, हाच माझा यानिमित्ताने इतरांनाही सल्ला आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरच्या मागणीसाठी रूग्णसंख्यानिहाय तक्ता करा, उच्च न्यायालयाचे आदेश

लशीमुळे धोका टळतो -

अंकुशच्या मते, कोरोनाच्या या भीषण लाटेत लस अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे मृत्यूचा धोका सहज टाळता येऊ शकतो. दुर्दैवाने मला कोरोनाची लागण झाली, त्यावेळेस लस भारतात यायचीच होती, त्यामुळे लस घेतली नव्हती. त्यामुळेच माझे इतके हाल झाले. लसीचे दोन डोज घेतलेल्या एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. त्या व्यक्तीला कोरोना झाला तर तो त्यावर सहजपणे त्यावर मात करू शकतो. 'सिरियस' होण्याची किंवा जीव जाण्याची शक्यता (मृत्यू दर) खूप कमी असते. त्यामुळे लसीकरण खूप गरजेचे असून, प्रत्येकाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबडतोब लस टोचून घ्यावी व मास्क वापरावे असे आवाहन त्याने यावेळी केले.