Annabhau Sathe Birth Anniversary : 'जग बदल घालूनी घाव...'; लढा 'साठे वस्ती'चा

परिवर्तनाच्या विचाराचे ‘कार्यकर्ते’ निधड्या छातीने वस्ती वाचवण्यासाठी बेंबीच्या देठापासून घोषणा देत होते.
Lokshahir Annabhau Sathe
Lokshahir Annabhau Sathesakal

नागपूर - ऐंशीच्या दशकातील दीक्षाभूमी चौकातील साठेवस्ती हटविण्याची नोटीस जारी झाली. आंदोलन उभारले गेले. वस्तीतील लोकसंख्येपेक्षा पोलिसांची संख्या अधिक होती. बंदुकीच्या नळ्या साठेवस्तीच्या दिशेने रोखून धरल्या होत्या. मात्र परिवर्तनाच्या विचाराचे ‘कार्यकर्ते’ निधड्या छातीने वस्ती वाचवण्यासाठी बेंबीच्या देठापासून घोषणा देत होते.

‘हर जोर जुलूम की, टक्कर मे संघर्ष हमारा नारा है’...‘साठे वस्तीचा विजय असो’, हा निर्धार व्यक्त करताना मानेवरील शिरा रक्ताने फुगत होत्या, मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बंदिस्त केले. आंदोलनकर्ते हरले, मात्र एक लढाई या कार्यकर्त्यांनी जिंकली...‘जग बदल घालूनी घाव! सांगुनी गेले मला भीमराव’ हा विचार सांगणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा प्रेरणादायी पुतळा चौकात बसविण्यात आला.

एक ऑगस्ट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ४० वर्षांपूर्वीच्या साठे वस्तीच्या आठवणींना उजाळा कार्यकर्त्यांनी दिला. ही वस्ती वाचवण्यासाठी अनुराधा गांधी, प्रा. शोमा सेन, उमेश चौबे, विजय राघवन, संजय कठाळे, शंकरराव वानखेडे, अशोक भावे, किशोर बेहाडे, आनंद इंगळे, नरेश कठाळे, महादेव इंगोले,

जीवन गायकवाड, नाना साळवे, दामाजी गायकवाड, राजीव सर्वनिळे, रमेश निखाडे, राजेश खंडारे, राजु सोरगीले तसेच मातंग समाज महासंघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी लढा दिला होता. साठेवस्तील १०० झोपड्या उद्‍ध्वस्त झाल्या. सारी कुटुंबे रस्त्यावर आली.

महिना लोटून गेल्यानंतरही या वस्तीतील नागरिक उघड्यावर आयुष्य जगत होते. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती बेडगे त्यावेळी होते. अनुराधा गांधी यांच्यासह महिलांनी देखील लढा लढला होता. एक दिवस लढाई सुरू असताना साठे वस्तीतील उद्‍ध्वस्त झालेल्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा दडपून टाकला.

साऱ्यांना पोलिस व्हॅनमध्ये कोंबले. धो..धो..पाऊस पडत होता. लहान मुले, बाया बापड्या म्हतारे सारे ओलेचिंब झाले होते, परंतु रस्त्यावरची लढाई सुरू होती. एका महिला शहीद झाली होती. अखेर ही लढाई जिंकली आणि एकात्मतानगरात जागा देण्याचे मान्य केले.

अभ्यासिका व्हावी

ही जागा साठे वस्तीची आहे. या जागेवर ताबा साठे वस्तीचाच आहे. मात्र या जागेला पाय फुटले. पोलिस ठाणे तयार झाले. आता उर्वरित जागेवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती, स्मृतिदिनाचा कार्यक्रम व्हावा यासाठी ही जागा समाजाला द्यावी अशी मागणी करण्यात आली.

या मागणीला यश आले. येथे शेड तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. १० लाखांचा निधी प्रशासनाने दिला. येथे अभ्यासिका उभारण्यासाठी समाजातील सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com