
नागपूर : हक्कासाठी एखाद्या खेळाडूला शासनदरबारी किती खेटे घालावे लागू शकतात, हे दिव्यांग तिरंदाज संदीप गवईशिवाय दुसरा कुणीच सांगू शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळविल्यानंतर संदीपने नोकरीसाठी अर्ज व विनंत्या केल्या. "सीएम'पासून "डीएसओ'पर्यंत उंबरठे झिजविले. मात्र, आठ वर्षे लोटूनही अद्याप त्याला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागतो आहे.
मला आता तरी कुणी न्याय देणार काय हो? अशी विनवणी संदीपने "सकाळ'मार्फत शासनाकडे केली आहे. लॉकडाउनमुळे तर त्याच्या संघर्षात आणखी भर पडली. 41 वर्षीय संदीप हा दर्जेदार दिव्यांग तिरंदाज व पॉवरलिफ्टर आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकल्यानंतर थायलंड, इटली व झेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. 2011 मध्ये बॅंकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने ब्रॉंझपदकाचीही कमाई केली. त्याच वर्षी संदीपच्या कामगिरीची राज्य शासनाने दखल घेत त्याला प्रतिष्ठेच्या एकलव्य पुरस्काराने सन्मानित केले.
आंतरराष्ट्रीय पदकविजेता खेळाडू या नात्याने त्याने 2012 मध्ये शासकीय नोकरीसाठी राज्य शासनाकडे रीतसर अर्ज केला. मात्र, आठ वर्षांचा काळ लोटूनही अद्याप त्याच्या अर्जावर शासनाने विचार केला नाही. यादरम्यान संदीपने मंत्रालयापासून ते जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वांचे उंबरठे झिजविले. वारंवार अर्ज, विनंत्या व निवेदने दिलीत. पण, कुणीही त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे नाइलाजाने त्याने पोटापाण्यासाठी लग्न समारंभांमध्ये फेटे बांधण्याचा व्यवसाय सुरू केला.
संदीपच्या मते, अनेक दिव्यांग खेळाडूंना नोकऱ्या असूनही, त्यांच्या अर्जावर पुन्हा विचार करण्यात आला. पुण्या-मुंबईच्या अनेकांना नोकऱ्या देण्यात आल्या. परंतु, ज्याला खरोखरच नोकरीची गरज आहे, त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे. दिव्यांगांना 45 वर्षांपर्यंतच शासकीय नोकरीची संधी आहे. त्यामुळे त्याची नोकरीसाठी धडपड सुरू आहे. माझ्या अर्जावर शासनाने आता तरी गांभीर्याने विचार करावा, अशी त्याची मागणी आहे.
लॉकडाउनचा फटका
अन्य खेळाडूंप्रमाणे संदीपलाही लॉकडाउनचा फटका बसतो आहे. लॉकडाउनमुळे सध्या शहरातील विवाह सोहळे बंद असल्यामुळे तो बेरोजगार झाला आहे. अख्ख्या सीझनमध्ये लग्न न झाल्याने त्याची एका रुपयाचीदेखील कमाई झाली नाही. त्यामुळे रेशनचे धान्य व भावाच्या मदतीवर त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. संदीपच्या परिवारात पत्नी, दोन मुले व अर्धांगवायूने आजारी आई आहे. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी संदीपवर आहे. कमाईचे दुसरे साधन नसल्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे. नोकरी मिळाल्यास आपली कायमची चिंता मिटेल, असे त्याला वाटते.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. पण, त्यांचा दिव्यांग खेळाडूंना फायदा होताना दिसत नाही. माझ्या नोकरीची फाईल कित्येक वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे. त्यावर गांभीर्याने विचार करून माझी अडचण दूर करावी एवढीच एक अपेक्षा आहे.
संदीप गवई, आंतरराष्ट्रीय दिव्यांग तिरंदाज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.