लेखकांच्या कथा-संकल्पनांची सर्रास चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

authors story concepts stolen

लेखकांच्या कथा-संकल्पनांची सर्रास चोरी

नागपूर : लेखकांनी लिहिलेल्या कथा, संकल्पनांवर चित्रपट, लघुपट साकारण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून मेहनत करून घेतल्या जाते. आपला स्वार्थ साधल्यावर काही काळानंतर याच कथा संकल्पनांवर निर्माते चित्रपट काढतात. आपल्या साहित्याची चोरी झाल्याचे या लेखकांना कळतही नाही. कथा, संकल्पना चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

अनेकदा चित्रपट निर्माते ‘वन लाइनवर (संकल्पना) लेखकाला कथानक लिहायला सांगतात. ‘काम मिळाले’ या उत्साहामध्ये लेखक लिखाण पूर्ण करतो. काही दिवसांनी मात्र तो प्रोजेक्ट बंद झाल्याचे लेखकाला कळते. लेखक कथानक पूर्ण करण्यासाठी संशोधन करतो. अनेक ठिकाणांना भेटसुद्धा द्यावी लागते. या प्रक्रियेमध्ये लेखकाला आर्थिक झळही बसते. या पेक्षा गंभीर म्हणजे तीच वन लाईन, तेच कथानक कालांतराने चित्रपट रूपाने लेखकाच्या पुढे येत असल्याने यामुळे लेखकाला बसणारा धक्का पैशापेक्षाही मोठा असतो.

‘स्क्रीन रायटर असोसिएशन’च्या नियमावलीनुसार मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवोदित लेखकाला तीन लाख तर अनुभवी लेखकाला सहा ते दहा लाखापर्यंतचे मानधन मिळायला हवे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटाच्या बजेटनुसार टक्केवारीने लेखकाला मानधन मिळायला हवे, अशा नियमांची तरतूद आहे. याचे उल्लंघन झाल्यास लेखक न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतो.

लेखकांनी काय करावे?

  • कथेनुसार करार करून घ्यावा. सोबतच या प्रक्रियेसाठीच्या शुल्काची दिग्दर्शक किंवा संबंधिताला मागणी करा

  • तुमच्या संकल्पना, कथाबीज यावर कुणासमोरही चर्चा करू नका. तो विचार आपलाच असल्याचा आव आणत अनेक जण, अनेक चित्रपटांच्या सेटवर सांगत फिरतात.

  • स्क्रीन रायटर असोसिएशन, मुंबई (अंधेरी)चे तात्पुरते अथवा आजीवन सभासदत्व स्वीकारावे.

  • कथाबिजाची लघुकथा, सार तयार करून त्याची नोंदणी करावी.

  • निर्माता संघासोबत होणाऱ्या पहिल्या चर्चेची व्हिडिओग्राफी करावी.

निर्मात्यांकडून चित्रपटाच्या बजेटमध्ये लेखकाच्या मानधनाची परिपूर्ण सोय केल्या जात नाही. निर्मात्याने लिखाणापूर्वीच्या शुल्काचाही समावेश आपल्या बजेटमध्ये करायला हवा. यामुळे, लेखकाला बसणारा फटका टाळता येऊ शकतो.

- धनंजय मांडवकर, लेखक, कलावंत

Web Title: Authors Story Concepts Stolen Producers Writer Movies Short Films Cinema

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..