esakal | खबरदार! जर एकही मृत्यू झाला तर, वाडीवासींनी दिला गंभीर इशारा...
sakal

बोलून बातमी शोधा

वाडीः रुग्णालयाच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात झालेल्या सभेत प्रशासनासमोर समस्या ठेवताना सर्वपक्षीय नेते.

यानंतर जर एकही मृत्यू झाला तर मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यापूर्वी मृतदेह नगरपालिका व तहसील कार्यालयात आणण्यात येईल तसेच अधिकारी व शासनाच्या विरोधात ‘वाडी बंद’चे आवाहन करण्यात येईल, असे निक्षून सांगितले. वाडीतील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित होताच रुग्णालयाचे संचालक राहुल ठवरे व समितीच्या पदाधिकाऱ्यांना शाब्दिक चकमक उडाली.

खबरदार! जर एकही मृत्यू झाला तर, वाडीवासींनी दिला गंभीर इशारा...

sakal_logo
By
विजय वानखेडे

वाडी(जि.नागपूर): सात दिवसाच्या आत तातडीने कोरोना उपचार केंद्र उभारणे, प्रस्तावित १०० बेडच्या रुग्णालयाला मंजुरी देणे, खासगी दवाखाने व डॉक्टरांच्या दुर्लक्षित वर्तणुकीवर दंडात्मक कारवाई करणे, आदी मागण्यांसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी तहसील कार्यालयात नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत ठेवल्या. परंतू या बैठकीत एक लाख लोकसंख्येचा गंभीर प्रश्न असूनही प्रारंभी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले तर पूर्णवेळ प्रशासक असलेल्या इंदिरा चौधरी या गैरहजर असल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त करून निषेध केला. सात दिवसांत वाडीत ५० ऑक्सीजनयुक्त बेडचे रुग्णालय केंद्र उभारण्याची एकमुखी मागणी लावून  धरण्यात आली.
 

अधिकारीच गैरहजर असतील तर...
अधिकारीच जर गैरहजर असतील तर ही बैठक काय कामाची, असा प्रश्नही सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केला. तहसीलदारांनी वाडी परिसरातील खासगी डॉक्टरांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देऊनही फक्त वेल ट्रिट रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने कोरोना बाबतीत कोणीही गंभीर नसल्याने यावरही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. सुरुवातीला समितीचे पदाधिकारी प्रकाश कोकाटे यांनी वाडीतील कोरोनाची गंभीर परिस्थिती व नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची कार्यप्रणाली, खासगी डॉक्टरांच्या असहकार्याचा दाखला देऊन आजपर्यंत २४ रुग्ण मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर समितीचे पदाधिकारी श्याम मंडपे, केशव बांद्रे, राजेश जंगले, संजय अनासने, प्रेम झाडे, राहूल सोनटक्के, मधु मानके पाटील, दुर्योधन ढोणे यांनी सात दिवसात वाडीत ५० ऑक्सीजनयुक्त बेडचे रुग्णालय केंद्र उभारण्याची मागणी केली.

अधिक वाचाः नागपुरात भयावह स्थिती, एकाच दिवशी ५१ मृत्यू, बाराशेवर बाधित
 

शासनाच्या विरोधात ‘वाडी बंद’चे आवाहन
यानंतर जर एकही मृत्यू झाला तर मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यापूर्वी मृतदेह नगरपालिका व तहसील कार्यालयात आणण्यात येईल तसेच अधिकारी व शासनाच्या विरोधात ‘वाडी बंद’चे आवाहन करण्यात येईल, असे निक्षून सांगितले. वाडीतील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित होताच रुग्णालयाचे संचालक राहुल ठवरे व समितीच्या पदाधिकाऱ्यांना शाब्दिक चकमक उडाली. बैठकीला या चर्चेत कमल कनोजे, आशीष ईखनकर, दिनेश कोचे, अश्विन बैस, मनोज रागिट, अमित हुसनापुरे, हरीश हिरणवार, संतोष केचे यांनीही चर्चेत सहभाग घेऊन मागणीचे समर्थन केले.


१०० बेडच्या रुग्णालयाचा प्रस्ताव मार्गी लागणार
उशिरा का होईना बैठकीच्या समारोपाप्रसंगी वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले हे बैठकीला पोहोचले. नगरपरिषदेकडे पुरेसा निधी असल्याने तातडीने कोरोना आकस्मिक उपचार केंद्राची निर्मिती करावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला.त्यावर त्यांनी हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा लागेल असे सांगितले. उपस्थितांनी आवश्यक सुविधा दानातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय व्यक्त केला, परंतू मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासक इंदिरा चौधरी यांच्याशी चर्चा करून गुरुवारी निधी घेण्याचे मान्य केले, तर तहसीलदार मोहन टिकले यांनी एक लेखी आदेश काढून मुख्याधिकाऱ्यांनी या सर्व कृती समितीच्या पदाधिकाऱ्‍यांची बैठक आयोजित करून समस्या निवारण करण्याचे सूचित केले, तसेच प्रलंबित १०० बेडच्या रुग्णालयाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी कार्यवाही प्रारंभ करण्याचे ठरविण्यात आले.

अधिक वाचाः साथीदाराच्या मदतीने पतीला संपविले, धरणात फेकला मृतदेह
 

प्रशासनाने हे करावे-
-शासनाकडे मंजूर असलेल्या १०० बेडच्या रुग्णालय प्रक्रियेला गती देणे.
-खासगी रुग्णालयाची मनमानी थांबविणे.
-वाडी नगरपरिषदेची संथ कार्यप्रणाली सुधारणे
- मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांची एकतर्फी कार्यपद्धतीकडे लक्ष देणे.

संपादनः विजयकुमार राऊत

loading image
go to top