esakal | वॉर्डबॉयने रुग्णालयातूनच चोरले रेमडेसिव्हिर, २० हजाराला विक्री

बोलून बातमी शोधा

remdesivir
वॉर्डबॉयने रुग्णालयातूनच चोरले रेमडेसिव्हिर, २० हजाराला विक्री
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शनची काळाबाजार अजूनही सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, एक्स रे टेक्निशियन्स, नर्स, वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. तसेच रुग्णालयातून इंजेक्शन चोरीचेही प्रकार समोर येत आहेत. धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सफल रुग्णालयातील एका वॉर्ड बॉयने रुग्णालयाच्या फ्रीजमध्ये ठेवलेले रेमडेसिव्हिर चोरून रुग्णालयात दाखल एका रुग्णाच्या नातेवाईकाला २० हजार विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

हेही वाचा: 'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार

अतुल हिरडकर (वय २७, रा. उमरेड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. सुनील सूद (वय ४७, रा. निलगगन सोसायटी, धंतोली) यांचे काँग्रेसनगर येथे सफल रुग्णालय आहे. आरोपी हा दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कामाला लागला. या रुग्णालयाच्या फ्रीजमध्ये रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर ठेवले होते. आरोपीने फ्रीजमधील एक रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन चोरून रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला २० हजारात विकले. रुग्णालयातील एक रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन चोरीला जाताच डॉक्टरांनी सर्व कर्मचाऱ्यांची झडती घेतली. त्यावेळी डॉ. सूद यांना दोन दिवसांपूर्वी कामावर रुजू झालेल्या आरोपीवर संशय आला व त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. धंतोली पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

तिघांची कारागृहात रवानगी

रेमडेसिव्हिर विकण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आलेल्या तिघांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. वॉर्ड बॉय शुभम संजय पानतावने (वय २४, रा. मूळ रा. सेवाग्राम), त्याचे मित्र प्रणय दिनकरराव येरपुडे ( वय २१, रा. महाल) व मनमोहन नरेश मदन (वय २१, दोन्ही रा.महाल), अशी आरोपींची नावे आहेत. शुभम याने रेमडेसिव्हिर कोठून चोरी केले ,त्याला कोणी दिले याचा शोध सीताबर्डी पोलिस घेत आहे.