Nagpur News : ब्रह्मपुरीतील वाघिणी नांदणार नवेगावात

स्थलांतरणाचे आदेश; राज्यातील पहिलाच प्रयोग
brahmapuri 2 female tiger
brahmapuri 2 female tiger sakal

नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धनातील स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी येथील दोन वाघिणींना सोडण्याच्या हालचालींना वेग आला.

त्यासाठी १५ जणांची चमू तयार केली असून, वाघिणीला जेरबंद करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली. दोन वाघिणींना थेट व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात येणार असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर विविध संरक्षित क्षेत्राचा अभ्यास करून त्या ठिकाणी अतिरिक्त वाघांचे स्थलांतरण करण्याचा प्रयत्न आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चार वाघिणींना सोडण्याचा निर्णय राज्याच्या वन विभागाने घेतला. पहिल्या टप्प्यात पुढील दहा दिवसांत दोन्ही वाघिणींना सोडण्याचा प्रयत्न आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या समांतर नाही.

त्यामुळे येथे चार वाघीण सोडून ही संख्या समांतर करण्यासाठी निर्णय घेण्यात आले. या वाघिणी दीड ते दोन वर्षांच्या आहेत. वनविभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक बिलाल हबीब हा प्रकल्प हाताळत आहेत.

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांची संख्या चांगली असल्याने या प्रकल्पाची निवड करण्यात आली. काही वन्यजीवप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केला असून, काही मात्र आनंदित आहेत.

ब्रह्मपुरी येथील चार वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने १५ सप्टेंबरला मंजुरी दिली. पहिल्या टप्प्यात दोन वाघिणींना सोडले जात आहे.

ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघांच्या अतिरिक्त संख्येमुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत येथील वाघांच्या स्थलांतरणाचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी मे २०२२ मध्ये मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला.

त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून स्थलांतरणाची परवानगी घेण्यात आली. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम १२ (बीबी) अंतर्गत मंत्रालयाने नुकतेच १५ सप्टेंबरला पाच मादी वाघांना रेडिओ कॉलर लावण्याची परवानगी दिली.

राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीकडून यासाठी मंजुरी मिळाली. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञांनी परिसराची पाहणी केल्यानंतर हिरवी झेंडी दिली. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचे प्रशासनही सज्ज आहे.

ब्रह्मपुरीतील वाघिणी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरणासाठी १५ जणांची चमू तयार केली आहे. त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दहा दिवसांत ही मोहीम फत्ते करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची यंत्रणा कामाला लागली आहे.

-महीप गुप्ता,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com