esakal | दमदार पाऊस व महापुराने उडवली दाणादाण; आता प्रादेशिक हवामान विभागाने दिला हा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Chance of two days of torrential rain in Vidarbha

सोमवारी शहरात सकाळी व सायंकाळच्या सुमारास काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. वानाडोंगरी परिसरात सकाळी जवळपास अर्धा ते पाऊण तास धुवाधार पावसाने दाणादाण उडविल्यानंतर, सायंकाळी साडेचारच्या सुमारास शहरातही काही ठिकाणी हलका पाऊस पडला. विदर्भात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दमदार पाऊस व महापुराने उडवली दाणादाण; आता प्रादेशिक हवामान विभागाने दिला हा इशारा

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : अरबी समुद्र व पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे विदर्भात पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, दुहेरी पट्ट्यांमुळे दोन-तीन दिवस मध्य भारतावर ढगांची दाटी राहणार आहे. त्यामुळे मंगळवार व बुधवारी विदर्भात अनेक ठिकाणी विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे. विशेषतः नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! ४ दिवसांपासून शवागारात पडून होता वडिलांचा मृतदेह; पोटच्या पोराने मोबाईल केला बंद.. अखेर...  

सोमवारी शहरात सकाळी व सायंकाळच्या सुमारास काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. वानाडोंगरी परिसरात सकाळी जवळपास अर्धा ते पाऊण तास धुवाधार पावसाने दाणादाण उडविल्यानंतर, सायंकाळी साडेचारच्या सुमारास शहरातही काही ठिकाणी हलका पाऊस पडला. विदर्भात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हिट'चा अनुभव

दमदार पाऊस व महापुराने दाणादाण उडविल्यानंतर आता अचानक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पारा ३५ अंशांवर गेल्याने उकाडा असह्य होऊ लागला आहे. त्यामुळे कुलर व एसी पुन्हा सुरू झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे नागपूरकर ऐन सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हिट'चा अनुभव घेत आहेत.

महत्त्वाची बातमी - धक्कादायक! नातेवाईकांनी शेवटच्या क्षणी चेहरा दाखवण्याची केली मागणी; अन प्लॅस्टिक बाजूला करताच...

चार जिल्ह्यांनी पावसाची हजारी पार

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सून दाखल झाल्यापासून विदर्भात नियमित पाऊस सुरू आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आतापर्यंत सरासरीइतका पाऊस झाला आहे. नागपूर शहर (१०७६ मिलिमीटर), अमरावती (१०५२ मिलिमीटर), गोंदिया (१०४४ मिलिमीटर) आणि गडचिरोली (१००२ मिलिमीटर) या चार जिल्ह्यांनी पावसाची हजारी पार केली आहे.

किमान तापमानातही लक्षणीय वाढ

तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने हळूहळू तापमान वाढू लागले आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात नागपूरचे तापमान प्रथमच ३४.३ अंशांवर गेले. विदर्भातील अकोला (३५.२ अंश सेल्सिअस), वर्धा (३४.९ अंश सेल्सिअस), गोंदिया (३४ अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्येही पारा सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी वाढला असून, किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

तीन जिल्ह्यांमध्ये स्थिती अजूनही नाजूक

वाढत्या तापमानामुळे ऐन पावसाळ्यात नागरिक सध्या उन्हाळाचा ‘फील' घेत आहेत. सप्टेंबरमधील ‘ऑक्टोबर हिट'मुळे नागरिक हैराण झाले आहेत. असह्य उकाड्याने शरीरातून दिवसभर घामाच्या धारा निघत आहेत. त्यामुळे दिवसाच नव्हे, रात्रीही पंखे ‘फुल स्पीड'मध्ये चालवावे लागत आहेत. एसीही सुरू आहेत. विदर्भात सरासरी पाऊस झाला असला तरी, यवतमाळ, अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये स्थिती अजूनही नाजूक आहे.

विदर्भातील आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जिल्हा सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस तुट
नागपूर ७९० मिमी ८६५ मिमी +९
वर्धा ७५७ मिमी ६७० मिमी -११
अमरावती ७४२ मिमी ५७१ मिमी -२३
भंडारा १००२ मिमी १०५१ मिमी +५
गोंदिया १०६३ मिमी १०४४ मिमी -२
अकोला ६०० मिमी ४२६ मिमी -२९
वाशीम ६८१ मिमी ७१८ मिमी +५
बुलडाणा ५६४ मिमी ५६८ मिमी +१
यवतमाळ ७०५ मिमी ४९७ मिमी -३०
चंद्रपूर ९४४ मिमी ७९७ मिमी -१६
गडचिरोली १११० मिमी १००२ मिमी -१०

संपादन - नीलेश डाखोरे

loading image