esakal | उद्धव ठाकरे हे गोसेखुर्दला भेट देणारे पंधरावे मुख्यमंत्री; तब्बल ३७ वर्षे लोटूनही बांधकाम अपूर्णच
sakal

बोलून बातमी शोधा

CM Udhhav Thackeray is 15th CM to visit Gosekhurda Project Latest News 

नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या गोसेखुर्द धरणाचे भूमिपूजन १९८३ साली करण्यात आले होते. पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते.

उद्धव ठाकरे हे गोसेखुर्दला भेट देणारे पंधरावे मुख्यमंत्री; तब्बल ३७ वर्षे लोटूनही बांधकाम अपूर्णच

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर ः विदर्भातील सर्वाधिक सिंचन क्षमता असलेल्या गोसेखुर्द धरणाला भेट देणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री ठरले. हासुद्धा एक विक्रमच असून या धरणाचे काम अद्याप शिल्लकच आहे. लोकार्पणासाठी आणखी किती मुख्यमंत्र्यांना भेट द्यावी लागले हे सध्या जलसंपदा विभागालाही सांगता येणार नाही.

नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या गोसेखुर्द धरणाचे भूमिपूजन १९८३ साली करण्यात आले होते. पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. या एका धरणाने पूर्व विदर्भातील सिंचनाचा अनुशेष संपेल असे सांगण्यात येत होते. मात्र त्याऐवजी ३७ वर्षांत अनुशेष वाढल्याचे दिसून येते. 

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

धरणाच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर शिवाजीराव निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार तसेच विदर्भाचे सुपुत्र सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. हे सर्व राज्यातील वजनदार नेते! राज्य आणि केंद्रातही त्यांचे वजन होते. मात्र गोसेखुर्दच्या कामाची गती काही वाढली नाही.

१९९५साली राज्यात प्रथमच युतीची सत्ता आली. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भाचा अनुशेष पाच वर्षांत भरून काढू अशी गर्जना केली होती. श्वेतपत्रिकाही प्रसिद्ध करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. चार वर्षानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. गोसेखुर्दचे नशीब काही पालटले नाही. त्यानंतर पुन्हा काँग्रेसने सत्ता ताब्यात घेतली आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. ते अतिशय लोकप्रिय होते. 

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

हिवाळी अधिवेशनानंतरही ते नागपूरमध्ये मुक्कामी राहायचे. अनेकदा गोसेला त्यांनी भेटीसुद्धा दिल्या होत्या. सुशीलकुमार शिंदे परत विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे चार मुख्यमंत्री काँग्रेसने आघाडीच्या कार्यकाळात दिले. १९१४च्या निवडणुकीत भाजपने राज्य ताब्यात घेतले. विदर्भपुत्र देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला मुख्यमंत्री लाभला. त्यांना गोसेखुर्दची खडानखडा माहिती होती. त्यांचाही पाच वर्षांचा कार्यकाळ गोसेखुर्दने अनुभवला. आता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी धरणाला भेट दिली. त्यांनी अडचणी समजून घेऊ, असे आश्वासन दिले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image