esakal | प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना कोरोना, महाविद्यालयीनस्तरावर परीक्षा घ्यायच्या कशा?

बोलून बातमी शोधा

corona

प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना कोरोना, महाविद्यालयीनस्तरावर परीक्षा घ्यायच्या कशा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरसह पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. विद्यापीठाद्वारे महाविद्यालयास्तरावर ५ ते २० मेदरम्यान परीक्षा घेण्याचे वेळापत्रक देण्यात आले आहे. मात्र, बहुतांश महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने परीक्षा घ्यायच्या कशा असा प्रश्न प्राचार्य व प्राध्यापकांसमोर निर्माण झालेला आहे.

हेही वाचा: धक्कादायक! नागपुरात महिनाभरात तब्बल २२८२ कोरोनाबळी; ग्रामीण भागातही रुग्णसंख्या अधिक

विद्यापीठाद्वारे पदवी अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा विद्यापीठस्तरावर घेण्यात आल्यात. मात्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयास्तरावर घेण्याचे ठरले. मात्र, या अभ्यासक्रमाचे प्रवेश एप्रिल महिन्यापर्यंत पार पडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजेल यापूर्वीच परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात आल्यात. याउपर गेल्या महिन्याभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे एका घराआड रुग्ण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय विद्यार्थी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. अशा परिस्थिती हे विद्यार्थी कशी काय परीक्षा देणार हा मोठा प्रश्न आहे. मात्र, याबाबींचा विचार न करता, विद्यापीठाने ५ ते २० मेदरम्यान परीक्षा संपविण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावयाच्या कशा असा प्रश्न प्राचार्यांना पडला आहे.

हेही वाचा: कडक निर्बंधात व्यवसाय बदलण्याची वेळ; कोणी विकतो भाजीपाला, तर कोणी करतो फळविक्री

दिलासा द्यावा

विद्यापीठाने महाविद्यालयांवर परीक्षा घेण्याची जबाबदारी टाकून दिली आहे. मात्र, प्रत्येकच महाविद्यालयातील काही प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे अशावेळी परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी प्राचार्य फोरमने केली होती. त्यावर कुलगुरूंनी सकारात्मकता दर्शविली होती. मात्र, त्यावर अद्याप कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्याथी चिंतेत सापडले आहेत. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही प्राचार्य फोरमचे सचिव डॉ. आर.जी. टाले यांनी केली आहे.