esakal | नागपूर 'ZP'त सुनील केदारांनी गड राखला, भाजपला मोठा धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

congress minister sunil kedar

ZP Election 2021 : नागपुरात सुनील केदारांनी गड राखला, भाजपला मोठा धक्का

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या (Nagpur ZP Election 2021) १६ जागांसाठी व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सर्वाधिक जागांवर ताबा मिळविला आहे. पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या प्रचाराच्या झंझावातामुळे त्यांनी विजयाचा गड राखला, तर भाजपाचे बडे नेते देवेंद्र फडणवीस प्रचारार्थ न फिरकल्याचा फटका प्रकर्षाने भाजपाला बसल्याची वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा: 'चुलीत गेलं मंत्रिपद, उद्या राजीनामा देतो'; बच्चू कडू संतापले

हेही वाचा: नागपुरात भाजपला मोठा धक्का, बावनकुळेंचे कट्टर समर्थक पराभूत

काँग्रेसने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मंत्री केदार निवडणुकांच्या प्रचारापासून पायाला भिंगरी बांधल्यागत जिल्हाभरात फिरत होते. अनिल देशमुखांची अनुपस्थितीही त्यांनी भरून काढत राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. ओबीसींच्या मुद्यांवरून सुरू झालेल्या निवडणुकीत ओबीसींचा मुद्दा मात्र शेवटपर्यंत दिसला नाही. स्थानिक नेत्यांनी केलेला विकास, त्याचा मतदार संघातील राबता यावरूनच मतदारांनी त्यांना विजयाचा दावेदार बनविले. सर्वाधिक धक्का भाजपाला बसला. त्यांना विरोधी पक्ष नेते असलेला तगडा उमेदवार अनिल निधान यांची जागा गमवावी लागली. राष्ट्रवादीला दोन जागांचा फटका बसला. तर शेकापचे समीर उमप यांनी आपली जागा कायम राखली. पारडसिंगाची राष्ट्रवादीचे उमेदवार शारदा चंद्रशेखर कोल्हे यांची जागा भाजपाच्या मीनाक्षी संदीप सरोदे यांनी खेचून नेली. अनिल देशमुखांचा प्रचार व उपस्थिती या मतदारसंघात असती तर ही जागा राष्ट्रवादीला कायम राखता आली असती. भाजपाला ६ जागांवर विजय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपाचा कुठलाही बडा नेता प्रचारासाठी जिल्ह्यात न फिरकल्याने भाजपाचे यश हातचे गेल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीत फडणवीस यांनी जातीने लक्ष विविध मतदार संघावर होते. दुपारी १२ वाजेपर्यंत महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषेदतील सहा विजयी उमेदवारांचे निकाल हाती आले होते. तोपर्यंत भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला होता. त्यांना खातेही उघडता आले नव्हते. नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील भाजपाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ग्रामीण मतदारांनी भाजपाला नाकारल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे.

जिल्हा परिषद विजयी उमेदवार

 • हिंगणा (निलडोह ): संजय जगताप (काँग्रेस)

 • हिंगणा (डिगडोह ): रश्मी कोटगुले ( राष्ट्रवादी काँग्रेस)

 • हिंगणा (इसासनी): अर्चना गिरी (भाजपा)

 • मौदा (अरोली) : योगेश देशमुख (काँग्रेस)

 • काटोल (येणवा): समीर उमप (शेकाप)

 • काटोल (पारडसिंगा): मीनाक्षी संदीप सरोदे (भाजपा)

 • कामठी(गुमथळा): दिनेश ढोले (काँग्रेस)

 • कामठी (वडोदा): अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस)

 • नागपूर (गोधनी): कुंदा राऊत (काँग्रेस)

 • रामटेक (बोथीया पालोरा): हरीश उईके (गोंगापा )

 • पारशिवनी (करभाड ): अर्चना भोयर (काँग्रेस)

 • नरखेड (सावरगाव): पार्वता गुणवंत काळबांडे (भाजपा)

 • सावनेर (वाकोडी): ज्योती सिरसकर (काँग्रेस)

 • सावनेर (केळवद ): सुमित्रा मनोहर कुंभारे (काँग्रेस)

 • नरखेड (भिष्णूर): बाळू जोध ( राष्ट्रवादी काँग्रेस)

 • कुही (राजोला): अरुण हटवार (काँग्रेस)

कुठल्या पक्षाला किती जागा

 • काँग्रेस : ०९

 • भाजपा : ०३

 • राष्ट्रवादी : ०२

 • गोगंपा : ०१

 • शेकाप : ०१

 • एकूण: १६

२०१७ चे पक्षीय बलाबल

 • काँग्रेस: ३०

 • राष्ट्रवादी: १०

 • भाजपा: १५

 • शेकाप: १

 • शिवसेना : १

 • अपक्ष: १

जि.प. तील प्रवर्गनिहाय सदस्य संख्या

 • अनुसूचित जाती: १०

 • अनुसूचित जमाती: ७

 • नागरिकांचा मागास प्रवर्ग: १६

 • खुला प्रवर्ग: २५

 • सध्या - ४१ जागा खुल्या प्रवर्गातील झाल्या आहेत.

पक्षीय जागांची बेरीज वजाबाकी

 • काँग्रेस: ७ : २ (वाढ)

 • भाजपा: ४ : १ (कमी)

 • राष्ट्रवादी:४ : २ (कमी)

 • शेकाप:१ : कायम

अध्यक्ष, उपाध्यक्षांची मेहनत कामी आली

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रश्मी बर्वे व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतदार संघात तळ ठोकला होता. गावोगाव त्यांनी पिंजून काढले. 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न केला व त्यात त्यांना यशही आले. यासाठी कॅबिनेट मंत्री सुनील केदारांच्या सभांनी रंगत आणली. स्थानिक विकासाचे मुद्धे व भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे निवडणुका लादल्याचा त्यांनी केलेला प्रचाराचा मुद्धा मतदारांच्या चांगलाच पचनी पडला.

loading image
go to top