esakal | आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना रुग्णांचा जीव

बोलून बातमी शोधा

file image
आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना रुग्णांचा जीव
sakal_logo
By
राजेश प्रायकर ः @rajeshp_sakal

नागपूर : शहरात व्हेंटिलेटरयुक्त बेडची संख्या तोकडी असल्याने अनेक बाधितांना कित्येक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. यात अनेकांनी जीवही गमावले. सात महिन्यांपूर्वी राज्य सरकारने शहरात एक हजार बेडच्या जम्बो कोविड केअर सेंटरला मंजुरी दिली होती. यात व्हेंटिलेटरयुक्त चारशे बेडचा समावेश होता. त्याचवेळी विभागीय आयुक्त स्तरावर या प्रक्रियेला वेग आला असता तर शहरात व्हेंटिलेटर नसल्याने होणारे मृत्यू टाळणे शक्य झाले असते, अशी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा - किन्नर उत्तमबाबावर कारागृहात सामूहिक अत्याचार; आईला फोनवर सांगितली माहिती

मागील वर्षी जून, जुलैमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाला. त्यावेळीही बेड कमी पडले होते. शहराची ही स्थिती बघता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याप्रकरणी स्वतःच याचिका दाखल करून आरोग्य सुविधांबाबत राज्य सरकारला विचारणा केली होती. राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये उच्च न्यायालयात नागपुरात मानकापूर क्रीडा संकुलात एक हजार बेडचे जम्बो कोविड केअर सेंटरला मंजुरी दिल्याचे सांगितले होते. एवढेच या केअर सेंटरमध्ये चारशे व्हेंटिलेटरयुक्त तर तीनशे ऑक्सिजनचा पुरवठा असलेले बेड प्रस्तावित असल्याचेही राज्य सरकारने सांगितले होते. विभागीय आयुक्त तसेच महापालिका आयुक्तांना दोन आठवड्यात जम्बो कोविड केअर सेंटरचा आराखडा तयार करण्याचेही निर्देश दिल्याचे राज्य सरकारने न्यायालयापुढे नमुद केले होते. आज सात महिन्यांचा कालावधी लोटला पण मानकापूर क्रीडा संकुलात व्हेंटिलेटर तर सोडाच, एकही बेडची व्यवस्था करण्यात आली नाही. यात राज्य सरकारचे आदेश विभागीय आयुक्त तसेच महापालिका आयुक्तांनी केराच्या टोपलीत टाकून नागपूरकरांच्या जिवाशी खेळ मांडल्याचे दिसून येत आहे. मानकापूर क्रीडा संकुलात एक हजार बेड, त्यात चारशे व्हेंटिलेटरयुक्त बेड तयार झाले असते तर आज कोरोनाच्या संकटात अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असता, अशी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा - नागपुरात अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप; मात्र, पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

तेव्हा पालकमंत्री, आता महापौर

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मानकापूर येथे बेडचे जम्बो कोविड केअर सेंटरची घोषणा केली होती. राज्य सरकारनेही मंजुरी दिली. परंतु, त्यानंतर हा प्रस्तावाच्या कागदावर धूळ जमा झाली. आता महापौर दयाशंकर तिवारी यांनी काल रविवारी आयुक्तांना फोन करून मानकापूर क्रीडा संकुलात पाचशे बेडचे रुग्णालय तयार करण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या निर्देशाचे पालकमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे होऊ नये, अशी अपेक्षा नागपूरकर करीत आहेत.

हेही वाचा - फुलांसाठी शेतात घाम गाळला, पण सर्व फुलांचा कचरा झाला; आमचं नशीबच फुटकं म्हणत शेतकरी ढसाढसा रडला