esakal | चाचण्या करण्यासाठी किटच नाहीत, तर ग्रामीण भागातील कोरोना रोखणार कसा?

बोलून बातमी शोधा

corona
चाचण्या करण्यासाठी किटच नाहीत, तर ग्रामीण भागातील कोरोना रोखणार कसा?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तपासणी होत नाही. परंतु, रुग्णसंख्या वाढत आहे. दुसरीकडे अनेक केंद्रावरील तपासणी किट संपल्या आहेत. मागणी करण्यात आल्यानंतरही त्याचा पुरवठा होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: व्हीआयपींच्या एका फोनवर मिळतो लसीचा डोस; सामान्यांना मात्र बाहेरचा रस्ता; नागपुरातील वास्तव

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यात अधिक गतीने होत असल्याचे सांगण्यात येते. ग्रामीण भागात तपासणीचे प्रमाण कमी असण्यासोबत त्याकडे होत असलेले दुर्लक्ष प्रमुख कारण असल्याचा आरोप होत आहे. वर्षभरानंतर चार प्राथमिक केंद्र सुरू करण्यात आले असून ऑक्सिजनसाठी आता कॉन्संट्रेटर मशिनची खरेदी करण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ग्रामीण जनतेला बसत आहे. ग्रामीण भागात मनुष्यबळाची कमी असून त्यातच अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याने त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. ग्रामीण भागात अनेक केंद्रावरील तपासणी किट संपल्यात. मौदा तालुक्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. खात रेवरार सर्कलच्या सदस्या राधा अग्रवाल यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून केंद्रावरील किट संपल्या. मागणी केल्यावरही आरोग्य अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. वेळेत उपचार न झाल्यास जीव जाण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे अहवालही लवकर देण्याची मागणी त्यांनी केली.

प्रकाश खापरे यांनी सांगितले की त्यांच्या भागातील अनेक केंद्रावर किटचा तुटवडा आहे. त्यामुळे तपासणी रखडली आहे. प्रशासनाने किटचा पुरवठा लवकरात लवकर व जास्तीत जास्त केला पाहिजे. तपासणी किट नसल्याने रुग्णांना कसे ओळखणार आणि कोरोना आटोक्यात येणार कसा, असाच प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.