esakal | महापालिकेत कोव्हॅक्सिनचे २ हजार डोस पडून, मेडिकलमध्ये मात्र लसीचा तुटवडा

बोलून बातमी शोधा

vaccine
महापालिकेत कोव्हॅक्सिनचे २ हजार डोस पडून, मेडिकलमध्ये मात्र लसीचा तुटवडा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर महापालिकेकडे २ हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस पडून असताना मेडिकलमध्ये मात्र कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा आहे. मेडिकलमध्ये लस कमी असल्याने केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच लस उपलब्ध असल्याचे सांगून पहिला डोस घेण्यासाठी आलेल्या सामान्य व्यक्तींची बोळवण केली जाते. महापालिकेत २ हजार डोस पडून असूनही मेडिकलला लस उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा: "राहू द्या नं भाऊ.. वर्षभरापासून आम्ही अपमानच सहन करतोय"; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्यांना उपेक्षेची वागणूक

लसीकरण मोहीम १६ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली. जिल्ह्यात सर्वत्र कोविशिल्ड लस दिली जात असताना केवळ मेडिकलमध्येच कोव्हॅक्सिन लस दिली जाते. आतापर्यंत मेडिकलमध्ये १४ ते १५ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोव्हॅक्सिनचा डोस दिला गेला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या आतापर्यंत साडेपाच हजार झाली आहे. आणखी ९ हजार व्यक्तींना दुसरा डोस द्यायचा आहे. कोव्हॅक्सिन लसींचा अल्प प्रमाणात पुरवठा होत असल्याने पहिला डोस देण्याच्या मोहिमेला थांबा लावला आहे. दर दिवसाला मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी आलेले ज्येष्ठ व्यक्तीं परत जात आहेत. तर दुसरीकडे महापालिकेकडे २ हजार कोव्हॅक्सिन लस पडून आहेत. यावरून लसीकरणाबाबत पालिका गंभीर नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

डॉ. चिलकर यांचा फोन नुसताच खणखणतो -

मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्याशी यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल नुसताच खणखणत होता. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मागील चार दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.