Crime News Nagpur : कावीळच्या औषधीसाठी आली अन् बाळ घेऊन गेली Crime News Nagpur jaundice medicine kidnapped baby found after 12 hours | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस

Crime News Nagpur : कावीळच्या औषधीसाठी आली अन् बाळ घेऊन गेली

नागपूर : तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोमीनपुरा येथील जामा मशिदीसमोर असलेल्या फुटपाथवर झोपलेल्या महिलेच्या तीन महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण झाले. ही घटना शुक्रवारी (ता.२) पहाटे चार ते पाच महिन्याच्या सुमारास घडली. या प्रकाराने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. दरम्यान शहरातील संपूर्ण पोलिस यंत्रणा चिमुकल्याचा शोध घेत १२ तासात चिमुकल्याला परत आणले. चिमुकला सापडताच, बाळाचा विरहाचा टोहो फोडणाऱ्या आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू बघून पोलिसही सुखावले.

१६ तासानंतर अपहृत बाळ सापडले

शबनम मुजफ्फर असे चिमुकल्याला नेणाऱ्या महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिहाना परविन वसीम अंसारी असे पीडीत मातेचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी रिहाना ही आपला पती वसीम अंसारी सोबत मोमिनपुरा परिसरात रहात होती. या पती पत्नी दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात सतत वाद होत होते. कौटुंबिक कलहामुळे हे दोघेही काही वर्षांपूर्वी चारही मुलांना सोबत घेऊन सैलानी बुलडाणा येथे निघून गेले.

तिथे वसीम एका हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करीत होता. गुरुवारी या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या रिहानाने चारही मुलांना सोबत घेऊन रेल्वेने नागपूर गाठले. गुरुवारी मध्यरात्री नागपूर स्थानकावर पोचल्यानंतर तिने पायी मोमिनपुरा गाठले. इथे आल्यानंतर तिने जामा मस्जिद समोरील फुटपाथवर मुक्काम केला. ती चारही मुलांना घेऊन कपड्याच्या दुकानासमोरील फूटपाथवरच झोपली. पहाटे साडेचारच्या सुमारास आवेश या तीन महिन्याच्या मुलाला दूध पाजल्यानंतर तिला झोप लागली.

पहाटे पाचच्या सुमारास ती झोपेतून उठली असता आवेश नावाचा तीन महिन्यांचा मुलगा गायब असल्याचे तिला दिसले. तिने परिसरात शोध घेतला. मात्र, तो सापडत नसल्याने रिहानाने टाहो फोडला. अखेर तिन्ही मुलांना घेऊन तिने तहसील पोलिस ठाणे गाठले. माहिती देताच पोलिस यंत्रणेमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच अपहरणाचा गुन्हा दाखल करीत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केली.

दरम्यान पोलिसांनी शोध घेतल्यावर जरिपटका परिसरात एका महिलेने ते बाळ उचलून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घर गाठून महिलेसह ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी अपहृत चिमुकल्याला आईच्या ताब्यात दिले. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोहले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी पार पाडली. यावेळी गुन्हे शाखा, एएचटीयु, डीबी आणि सर्व पथक सहभागी झाले होते.

पदराखालून अलगद बाळाला उचलून नेले

मुलाचे अपहरण करणारी महिला ही मोमीनपुरा परिसरात पहाटे कावीळचे औषध घेण्यासाठी आली असल्याची माहिती आहे. तिला तीन महिन्यांचा आवेश अन्सारी हा महिलेच्या पदराखाली असल्याचे दिसून आले. यावेळी त्याला उचलून घेत, निघून गेली. दरम्यान आवेश अन्सारीचे अपहरण झाल्याची खबर वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यातून महिलेच्या आत्याने तहसील पोलिस ठाणे गाठले. तिने याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी महिला पोलिसांसह पथकाने जरीपटका गाठून महिलेसह मुलाला ताब्यात घेतले.

यापूर्वी तीन मुलांना दिले दत्तक

रिहानाने तहसील पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती आठ मुलांची आई आहे. यापैकी तिने तिन मुले दत्तक म्हणून दिली आहेत. तर तिच्या एका मुलाचा मृत्यू ओढवला आहे.