Nagpur News : वाघांसोबत आता वाढला हत्तींचाही धूमाकूळ

हत्तीच्या कळपाने केले नागणडोह गाव उद्ध्वस्त; शासकीय यंत्रणा ढिम्म
crop damage due to leopard tiger elephant forest department nagpur
crop damage due to leopard tiger elephant forest department nagpurSakal

Nagpur News : मानव-वन्यजीव संघर्ष संपूर्ण विदर्भात वाढलेला दिसत आहे. वाघ-बिबट्यांचे हल्ले व त्यामुळे होणारी प्राणहानी, तसेच अन्य प्राण्यांमुळे शेतीतील उभ्या पिकांचे होणारे नुकसान विदर्भात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

आजवर हत्तींचा अधिवास विदर्भातील जंगलांमध्ये नव्हता. पण अलीकडच्या काळात गडचिरोली आणि गोंदिया या विदर्भातील दोन जिल्ह्यांत हत्तींच्या कळपांनी धूमाकूळ घातला आहे. या दोन जिल्ह्यांतील वनक्षेत्रातील गावकऱ्यांची तर ‘इकडे वाघ, तिकडे हत्ती’ अशी स्थिती झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात शंभर टक्के आदिवासी अन् जेमतेम नऊ घरे व अवघी अर्धशतकी लोकसंख्या असलेले नागणडोह गाव २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यातील घटनेने एकदम चर्चेत आले. हत्तींच्या कळपाने हे अख्खे गाव उद्ध्वस्त केले. एक विहीर, एक बोअरवेल बस्स इतकेच या गावचे चित्र.

जंगलव्याप्त परिसर असून रात्र झाली की नेहमी वन्यप्राण्यांच्या वावर गावात हमखास बघावयास मिळतो. अशातच गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या हत्तींच्या कळपाने गावात थैमान घातले. नऊ घरांची राखरांगोळी केली.

जनावरांचे गोठेही पूर्णतः उद्ध्वस्त केले. हत्तींचा उद्रेक अन् धुमाकूळ पाहून जीवाच्या आकांताने भयभीत झालेल्या नागणडोहवासींयांनी बोरटोला आणि तिरखुरी या गावांची वाट धरली. तेथे राहण्यासाठी तात्पुरता निवारा बांधला.

एवढे झाल्यानंतर कुठे जंगलात लपलेल्या नागणडोहची परिस्थिती काय आहे, तेथील लोक कसे जीवन जगतात, याची जाणीव लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणेला झाली. अजूनही नागणडोहवासींना गावी जाण्याची, नव्याने छोटेसे घरकुल उभारण्याची ओेढ आहे. मात्र, शासनयंत्रणा ढिम्म आहे. हा ढिम्मपणा केवळ नागणडोहमध्येच दिसला असे नाही.

तो वन्यप्राण्यांचा त्रास सहन करणाऱ्या सर्वच गावातील गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना तो जाणवतो. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात वाघांसोबतच बिबट्यांचाही त्रास मोठा आहे. सहसा बिबट्या हा मानवी वसाहतीच्या शेजारी असलेल्या वनक्षेत्रात राहत पाळीव प्राण्यांवर उपजीविका करीत आला आहे.

आता तो थेट गावात येऊन आपल्या खाद्यासाठी हल्ले करतो. चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी बिबट्या समस्यामुक्त ग्रामयोजना राबविण्यात आली. इको-प्रो संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली. काही दिवस ही मोहीम चालली. मात्र, शासन यंत्रणेच्या ढिम्मपणाचा फटका या योजनेसाठीच्या निधीला बसला व निधीअभावी ही योजनाच थंडबस्त्यात पडली.

जिल्ह्यांत समित्यांचा अभाव

मानव व वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचा अंतर्भाव असलेली समिती नेमण्याचा शासन निर्णय झाला. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये अशा समित्या नेमल्या. पण त्या काय करतात, त्यांच्या बैठकी किती झाल्या, त्यात काय ठरले, याची माहिती सहसा उपलब्ध होत नाही.

वनविभाग मात्र वनसंरक्षक नियमितपणे विभागनिहाय बैठका घेऊन आढावा घेत असल्याचे सांगतो. बैठकींमध्ये केवळ चर्चा होतात. कृती मात्र शून्य होत असल्याची माहिती आहे. मानव-बिबट्या संघर्षावर उपाययोजना सुचविण्यासाठी विधानसभा सदस्यांची समिती डिसेंबर २०२३ मध्ये गठित करण्यात आली आहे.

या समितीने सहा बैठका घेण्याचे शासन आदेशात नमूद आहे. या समितीच्या काही ठिकाणी बैठकी झाल्या, तर काही ठिकाणी अजूनही झाल्या नसल्याची माहिती आहे. सहा बैठकी झाल्यानंतर ही समिती आपला अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे सादर करणार आहे.

ताब्यात घेण्याचे तंत्र

ए खाद्या वाघ वा बिबट्यांचे हल्ले वाढल्यानंतर त्यांना जेरबंद करण्याची मागणी समोर येते. पण ही जेरबंदीची एक निश्चित प्रक्रिया आहे. अगोदर ही मागणी योग्य आहे का, याची वनविभागाकडून शहानिशा केली जाते.

विभागीय बैठकीत त्यावर चर्चा होते. त्या बैठकीचा अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे जातो. तेथे वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन पुरावे आणि परिस्थिती तपासली जाते व नंतरच वाघ, बिबटे यांना पकडण्याची परवानगी दिली जाते. मागील दहा वर्षांत वनविभागाने ६० वाघ, ५० बिबट्यांना पकडले आहे.

प्राण्यांना पकडण्याच्या पद्धती : वाघ, बिबट्या पकडण्याच्या भौतिक आणि रासायनिक अशा दोन पद्धती आहेत. वन्यप्राणी पकडणाऱ्या पथकाकडून संबंधित प्राण्याचा वावर असलेल्या क्षेत्राची माहिती गोळा केली जाते. ट्रॅप कॅमेऱ्यात टिपलेली छायाचित्रे, पाऊल खुणा, चालण्याची पद्धत, प्राण्याचे वय, शरीराची स्थिती, स्वभाव या सर्व बाबी अभ्यासल्या जातात. नंतरच पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेतृत्वात योग्य पद्धत वापरली जाते.

भौतिक पद्धत : हल्लेखोर वाघ, बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात पिंजरे उभारले जातात. जाळी, नेटचासुद्धा वापर केला जातो. पिंजऱ्यात कोंबडी, बकरी ठेवली जाते. त्या आमिषाने वाघ, बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकतात.

रासायनिक पद्धत : हल्लेखोर वाघ, बिबट्या यांना पकडण्यासाठी त्यांना गुंगीचे डोस दिला जातो. वय, वजनानुसार तयार केलेला डोस डॉट मारून वन्यप्राण्यांच्या स्नायूत सोडला जातो. त्यासाठी जेरबंद करणाऱ्या पथकाला तासन् तास पाळत ठेवावी लागते. प्राणी बेशुद्ध होताच सुमारे २० ते ३० मिनिटांत तपासणी, रक्ताचे नमुने घेणे, वजन करणे,

या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्यानंतर बेशुद्ध प्राण्याला पिंजऱ्यात टाकून नंतर शुद्धीवर आणण्यासाठी इंजेक्शन दिले जाते. वाघ अथवा बिबट्या नरभक्षक झाले असल्यास मानवी प्राण्यांवर हल्ले करण्याची त्या प्राण्याची सवय खरेच झाली आहे, हे शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासले जाते.

तसेच त्याला ताब्यात घेणे शक्य होत नसल्यास व अपवादात्मक स्थितीतच त्याला ठार करण्याचे आदेश पूर्ण अभ्यासांती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून दिले जातात. काही वर्षांपूर्वी पोंभुर्णा परिसरात एका वाघाने धुमाकूळ घातला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी त्या वाघाला शूट करण्याचे आदेश दिले. मागील काही वर्षांतील ही एकमेव अशी घटना आहे. २००३ मध्ये ब्रह्मपुरी येथे सुद्धा वाघाला शूट करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com