esakal | नाना पटोले यांनी काहीही म्हटले की कॉंग्रेसचे नेते शरद पवारांकडे जाऊन बैठक घेतात
sakal

बोलून बातमी शोधा

केवळ बैठकांसाठी नानांचा वापर; नौटंकीवरून बावनकुळेंनी घेतला समाचार

केवळ बैठकांसाठी नानांचा वापर; नौटंकीवरून बावनकुळेंनी घेतला समाचार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात मांडलेले वाक्य न वाक्य ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी आहे. ३१ जुलै २०१९ चा अध्यादेश पाहिला तर ही बाब स्पष्टपणे लक्षात येईल. ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळावे, अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली व तसा वटहुकूम काढला. मात्र, फडणवीस सरकारने काढलेला वटहुकूम रद्द करण्याचे पाप महाविकासआघाडी सरकारने केले आहे. काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचे काम केले, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Devendra-Fadnavis-Chandrashekhar-Bawankule-Nana Patole-Ncp-Congress-Mahavikasaaghadi)

सरकारने विधीमंडळाचा राजकीय वापर केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत खोटे बोलत आहेत. आरक्षण द्यायचे नसेल तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट सांगावे. पण, असे खोटे धंदे करू नये. भविष्यात ओबीसी जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ओबीसी जनतेची दिशाभूल करू नये, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा: वर्धेत गोळीबार! जखमीच्या घरासमोर रक्ताचा सडा; नागरिकांमध्ये चर्चा

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा वापरली होती. ‘माझ्यावर पाळत ठेवली जात आहे’, असा आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारण खळबळ उडवून दिल्याचेही सांगण्यात येते. प्रत्यक्षात खळबळ वगैरे काहीही नाही. तिन्ही पक्ष मिळून नौटंकी करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

नेत्यांजवळ विकासाचे व्हिजन नाही

महाविकासआघाडी सरकारमधील एकही नेता विकासाची भाषा करताना दिसत नाही. दररोज नवीन नवीन भानगडी मात्र करीत असतात. एकाही नेत्याजवळ विकासाचे व्हिजन नाही. विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद करून ठेवले, महाराष्ट्र विकास मंडळ बंद केले, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा: भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?

आपसातल्याच भानगडी संपत नाही

नाना पटोले यांनी काहीही म्हटले की कॉंग्रेसचे नेते शरद पवारांकडे जाऊन बैठक घेतात. तिकडे मुख्यमंत्र्यांकडे वेगळी बैठक तर उपमुख्यमंत्र्यांच्या वेगळ्याच बैठकी सुरू असतात. मुख्यमंत्री म्हणतात, आम्हाला जेवायला बोलवा. हे काय चालले आहे महाराष्ट्रात. निव्वळ राजकारण सुरू आहे. इकडे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना आपसातल्याच भानगडी संपत नाही आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

(Devendra-Fadnavis-Chandrashekhar-Bawankule-Nana Patole-Ncp-Congress-Mahavikasaaghadi)

loading image