नागपूर : सायेब, पैसे दिल्यानंतरच मिळाली वीज!

अधिकाऱ्यांचा प्रताप; पाणी मिळाले पण विजेसाठी धावाधाव
Electricity officials demanded money install electric pumps farmer nagpur
Electricity officials demanded money install electric pumps farmer nagpursakal

नागपूर : गाड्यांचा ताफा गोसेच्या उजव्या कालव्यावर पोहोचला. अचानक ताफा आल्याने शेतात काम करणारे शेतकरी जिज्ञासू वृत्तीने कालव्यावर आले. अधिकारी सांगू लागले पाणी दिले. शेतकरी खूष आहे. यावर शेतकरी भडकले. सायेब कालव्याचे पाणी महागात पडले. विद्युत पंप लावण्यासाठी वीज अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली. ते देऊनच पाणी घेतले. शेतकरी एकापाठोपाठ एक असे अधिकाऱ्यांचे कारनामे सांगत होते. गोसे प्रकल्पामुळे शेतकरी कधी सुखी होईल सांगता येत नसले तरी तो दुःखी आहे हे वास्तव जनमंचच्या सिंचन शोधयात्रेत पुढे आले.

गोसे धरणाचे पाणी अडवून सरकारने प्रशासकीय कर्तव्याची खानापूर्ती केली. पाणी अडवूनही शेतकऱ्यांना पिकांसाठी ते मिळत नसेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका काय असणार? गोसेच्या उजव्या कालव्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही काम अपूर्ण असल्याने पाणी सोडले नाही. बांधलेल्या कालव्यात नैसर्गिक पाणी साचले. शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारणा केली. अधिकाऱ्यांनीही त्यांना लेखी परवानगी दिली नाही. इशारा केला. शेतकरीही इशारा समजला. मग वीज पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला. कालव्यावर विद्युत पंप बसविण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली. वीज अधिकारी अशा ठिकाणी वीज देता येत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करू लागला. पीक जगवायचे की वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांचे खिसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी अधिकारी जिंकला.

अधिकाऱ्यांना पैसे देऊन वीज जोडणी घेतल्याचे ढोरप येथील शेतकरी फाल्गुन राऊत यांनी सांगितले. जनमंचच्या यात्रेत शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी मांडली. कालव्यातील पाणी विद्युत पंपाद्वारे शेतीला देण्याचे प्रयत्न शेतकरी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पैसे देऊन वीज घेतल्याची माहिती यात्रेत पुढे आली.

उजव्या कालव्याची व्यथा

नागभीड तालुक्यातील तोरगाव, सावरला उजव्या कालव्याची व्यथाही तेवढी धक्का देणारी आहे. या कालव्याचे पाणी ६४ हजार हेक्टर जमिनीला सुजलाम् सुफलाम् करणार होते. मात्र, २०१५ मध्ये कालव्याच्या भिंती कोसळल्या. तोरगाव जवळील काही भागातील माती भुसभुशीत असल्याने भिंती कोसळत असल्याचे सांगितले. त्यामुळे कालव्याचे काम केव्हा पूर्ण होईल हा मोठा प्रश्न आहे. आयआयटीचे पथक या कालव्याची पाहणी करून गेले. त्यानंतर त्यांनी काय अहवाल दिला हे गुलदस्त्यात आहे.

२० गावे वंचित

ज्या शेतकऱ्यांनी कालव्यासाठी शेती दिली. त्या परिसरातील २० गावांना पाणीच मिळणार नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव भेंडारकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या विस्थापित करून कालव्याचे पाणी मुल, सिंदेवाही तालुक्याला पाणी पुरवणार आहे. मात्र, शेती गेलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही याचे दुःख आहे. यावर उपाय शोधण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वतः शेतकरी विद्युत पंपाने पाणी घेऊ शकतात. मात्र, त्यांच्या शेतात वितरिकेद्वारे पाणी मिळणार नसल्याचे वास्तव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com