जमावबंदीतही आंदोलन, सोयाबीन-कापसाच्या उत्पादकांसाठी स्वाभीमानीचा अन्नत्याग | nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमावबंदीतही आंदोलन, सोयाबीन-कापसाच्या उत्पादकांसाठी स्वाभीमानीचा अन्नत्याग

जमावबंदीतही आंदोलन, सोयाबीन-कापसाच्या उत्पादकांसाठी स्वाभीमानीचा अन्नत्याग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सोयाबीन, कापूस दरात तेजी असतानाच केंद्र सरकारने पोल्ट्री आणि दक्षीणेतील कापड लॉबीच्या दबावाला बळी पडत सोयाबीन पेंड आयातीला परवानगी दिली. त्यानंतर सोयाबीनचे भाव दहा हजारावरुन साडेपाच हजारापर्यंत खाली आले. आता दक्षीणेतील कापड लॉबीच्या दबावाखालील कापसासाठी देखील असेच धोरण राबविण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. शेतकरी विरोधी या धोरणाचा निषेध तसेच सोयाबीन व कापूस उत्पादकांच्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील संविधान चौकात बुधवार (ता.17) पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले.

बाजारात सोयाबीनचे दर 10 ते 11 हजार रुपये प्रती क्‍विंटल असताना केंद्र शासनाने पोल्ट्री उद्योगाच्या दबावाखालील सोया पेंड आयातीचा निर्णय घेतला, खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्यात आले एवढ्यावरच न थांबता साठवणूक मर्यादा देखील घालून देण्यात आली. त्यामुळे बाजारात सोयाबीनचे दर गडगडत चार ते पाच हजारापर्यंत कमी झाले. कापसाची आणि धानाची देखील तशीच अवस्था आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने बाजारात हस्तक्षेप करुन सोयाबीनचे दर आठ हजार रुपये, कापसाचे दर बारा हजार रुपयांच्या खाली येणार नाहीत तसेच धानाला एक हजार रुपये बोनस जाहिर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे अन्नत्याग आंदोलन केले जात असल्याची माहिती स्वाभिमानीची नेते रवीकांत तुपकर यांनी दिली.

हेही वाचा: हवेली पोलिसांचं 'वरातीमागून घोडं'; अखेर पोलीस अधीक्षकांनी घातलं लक्ष

राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना कृषीपंपाची वीज जोडणी कापण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. रबी पीकच्या लागवडीचे कोणत्याच प्रकारचे नियोजन शासनस्तरावरुन होत नाही. खरिपातील नुकसान भरपाईबाबतही राज्य सरकार उदासिन आहे. या साऱ्या संकटांमुळे शेतकरी आत्महत्यांच्या उंबरठ्यावर पोचला असून अशा निराशेतील शेतकऱ्यांना न्याय मिळावा या उद्देशाने सोयाबीन, कापूस व धान उत्पादकांसाठी आंदोलनाचा हा पर्याय अवलंबिण्यात आला आहे. आंदोलनात विदर्भाच्या विविध जिल्हयातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

गावागावात होणार आंदोलन

आंदोलनाच्या समर्थनार्थ गुुरुवारी (ता.18) गावात प्रभातफेऱ्या, शुक्रवारी (ता.19) चक्‍काजाम व शनिवारी (ता.20) गावस्तरावरील व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. तशाप्रकारच्या आंदोलनाची रुपरेषा तयार करण्यात आली आहे. त्यानंतर देखील केंद्र व राज्य सरकारकडून हे आंदोलन बेदखल करण्यात आले तर ते अधीक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: "सांगे कीर्ती बापाची तो एक मूर्ख" शीतल देसाई यांचा पटोले यांना टोला

पोलिसांनी बजावली नोटीस

त्रिपूरा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीच्या उपायातून पोलिसांकडून नागपूरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संविधान चौकातील या आंदोलनस्थळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी रवीकांत तुपकार यांना नोटीस बजावत आंदोलन न करण्याची ताकीद दिली. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी ठणकावले.

"सोयाबीन, कापूस उत्पादकांना न्याय मिळेस्तोवर अन्नाचा एक कणही खाणार नाही. माझा जीव गेला तरी बेहतर मात्र सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठीचे हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही."

-रवीकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

loading image
go to top