
‘जामिनासाठी बनावट कागदपत्रे’ ९० जण रडारवर!
नागपूर - आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बुधवारी पर्दाफाश केला. या प्रकरणाची पाळेमुळे बरीच खोलवर असल्याचे दिसून येत आहे. या प्रकणाच्या मुळाशी असलेल्या सुमारे ९० व्यक्तींची पोलिस चौकशी करणार असल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी व्यक्तीही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुनील मनोहर सोनकुसरे (वय ४५ रा.देशपांडे ले-आउट, वर्धमाननगर), सतीश रामकुमार शाहू (वय ३२ रा.देशपांडे ले-आउट, वर्धमाननगर), रवी सावरकर आणि आरती शाहू हे चौघेही न्यायालय परिसरात आरोपीला जामिन मिळावा बोगस आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र, बनावट घर कर पावत्या, एक कार, बनावट सरकारी शिक्क्यांच्या माध्ममातून चक्क न्यायालयासमोर एका व्हॅनमध्ये बसून अर्ध्या तासात प्रमाणपत्र तयार करून देण्याचे काम करीत असत. यासाठी न्यायालयीन प्रक्रियेतूनच आरोपी त्यांच्याकडे निश्चिंत होऊन येत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर असून त्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. सुनील आणि सतीश यांच्या कॉल डिटेल्समधून संबंधित असलेले जमानतदार, आरोपी आणि त्यांच्या संपर्कातील विविध अशा ९० लोकांची माहिती मिळाली असून त्यांना चौकशीसाठी पोलिसांद्वारे बोलाविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये प्रकरणात जामीन मिळालेल्या आरोपींचीही चौकशी केल्या जाणार असून त्यात अनेक मोठी मासे असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, प्राथमिक तपासात त्यांचा यांचेशी कसा काय संबंध आला, याबाबत चौकशी करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे.
प्रक्रिया ऑनलाइन झाल्याचे परिणाम
गेल्या काही वर्षांत न्यायालयातील बरीच कामे ऑनलाइन झालीत, त्यामुळे एकाच आधारकार्डवर हे करणे शक्य नसल्याने सुनील आणि सतीशने रवी सावरकरच्या माध्यमातून विविध आधार कार्ड आणि इतर प्रमाणपत्रांची जुळवाजुळव केली. ऑनलाइन नोंदणी करताना आधार क्रमांक वेगळा आणि फोटो वेगळा दाखवीत नाव कायम ठेवणे आणि बोगस कागदपत्र तयार करीत तिसराच व्यक्ती उभा करणे असा प्रकार केल्याचे उघड झाले. त्यातूनच इतक्या मोठ्या प्रमाणात फोटो जमा करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठी मासे असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: Fake Bail Documents Police Will Intersection 90 People
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..