पितळ पडले उघड; सरकार ४२६ शेतकऱ्यांकडून ३६ लाख रुपये करणार वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers will have to return the funds of Kisan Sanman Yojana

आता अशा अपात्र लाभार्थ्यांना योजनेच्या यादीतून हटविण्यात येणार आहे. आतापर्यंत त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले पैसेही परत घेतले जाणार आहेत. ज्यांनी खात्यातून पैसे काढून खर्च केले आहेत, त्यांच्यासाठी विशेष वसुली पथके नियुक्त करून मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पितळ पडले उघड; सरकार ४२६ शेतकऱ्यांकडून ३६ लाख रुपये करणार वसूल

sakal_logo
By
मनोज खुटाटे

जलालखेडा (जि. नागपूर) : केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी अर्ज केले. यात आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट असूनसुद्धा अनेकांनी रक्कम पदरात पाडून घेतली. मात्र, आता त्यांचे पितळ उघड पडले आहे. त्यांच्या खात्यात वर्ग झालेली ही रक्कम वसुलीची मोहीम सुरू झाली आहे. यामुळे आता नरखेड तालुक्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी परत करावा लागणार आहे.

महसूल विभागामार्फत मोठी यंत्रणा राबविण्यात येत असून, गावोगावी जाऊन अशा अपात्र लाभार्थ्यांना मिळालेला निधी परत करण्याचे नोटीस देण्यात येत आहेत. देशातील छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. ठराविक टप्प्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

योजना जाहीर करतानाच त्याचे लाभार्थी कोण असतील, हेही जाहीर केले होते. तरीही अनेकांनी आयकर भरत असतानाही सुद्धा नोंदणी केली. विशेष म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले. आता योजनेच्या पुढील टप्प्यातील तरतुदीनुसार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. त्यामध्ये अनेकांचे पितळ उघड पडत आहे.

आता अशा अपात्र लाभार्थ्यांना योजनेच्या यादीतून हटविण्यात येणार आहे. आतापर्यंत त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले पैसेही परत घेतले जाणार आहेत. ज्यांनी खात्यातून पैसे काढून खर्च केले आहेत, त्यांच्यासाठी विशेष वसुली पथके नियुक्त करून मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे पैसे भरण्यासाठी एक स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्यामध्ये सरकारला परत करायचे पैसे भरले जात आहेत.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

यांच्यावर कोसळणार कुऱ्हाड

योजनेच्या निकषानुसार जर शेतजमीन ही शेती करण्यायोग्य आहे, पण संबंधित शेतकरी त्याचा उपयोग दुसऱ्या गोष्टीसाठी करीत असेल तर तो या योजनेसाठी पात्र नाही. जर शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करीत असेल तर तो ही या योजनेसाठी अपात्र ठरणार. जर संबंधित शेतकरी करदाता असेल तर तो ही यासाठी अपात्र ठरणार आहे.

नोटीस देऊन पैसे भरण्याची सूचना

प्रत्यक्षात या अटींची पूर्तता न करणाऱ्या अनेकांनी या योजनेचा फायदा घेतल्याचे पडताळणीत आढळून आले. आता अशा शेतकऱ्यांनी घेतलेले पैसे परत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तालुकास्तरापर्यंत यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. वसुली पथके गावोगावी जाऊन अशा अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या नावांच्या यादीनुसार शेतकऱ्यांना नोटीस देऊन घेतलेले पैसे पुन्हा भरण्याची सूचना देण्यात येत आहे.

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

प्रस्ताव सरकारला पाठविण्यात येईल
सरकारच्या आदेशानुसार व मिळालेल्या यादीनुसार निधी परत करण्यासाठी नोटीस बजावण्यात आले आहे. यात काही शेतकरी पात्र असतानादेखील नोटीस देण्यात आली असेल तर त्यांनी पुराव्यासह अर्ज केला तर त्यांचा योग्य तो विचार करून प्रस्ताव सरकारला पाठविण्यात येईल. पण जे पात्र नसतानादेखील लाभ घेतला असेल तर त्यांनी मिळालेला निधी सरळ चेक अथवा डीडीद्वारे तहसीलदार नरखेड यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खाते क्रमांक ३४४४६८४९०७९ मध्ये जमा करावा किंवा तहसीलदार नरखेड यांच्या नावाने चेक तलाठीकडे जमा करावा.
- डी. जी. जाधव,
तहसीलदार, नरखेड

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top