अमरावतीत पन्नास जणांना अटक | Amravati | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

अमरावतीत पन्नास जणांना अटक

अमरावती : त्रिपुरामधील घटनेचा निषेध म्हणून पुकारलेल्या अमरावती ‘बंद’दरम्यान शनिवारी (ता. १४) संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्रीनंतर धरपकड सुरू केल्यानंतर आज सकाळपर्यंत ५० जणांना अटक केली. तर आज सकाळीच शहर व ग्रामीण भागातून काही भाजप नेत्यांना स्थानबद्ध केले. नांदेडमध्येही सुमारे ३५ जणांना ताब्यात घेतले आहे.

स्थानबद्ध केलेल्या भाजप नेत्यांपैकी काहींना शहरात तर काहींना ग्रामीण भागात पोलिसांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. स्थानबद्ध केलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे व भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांचा समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले. या दोघांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. रविवारी पहाटेपर्यंत शहरातील काही भागांत धरपकड मोहीम सुरूच होती. शहर कोतवाली पोलिसांनी त्याप्रकरणी दोन्ही गटांतील जमावाविरुद्ध जाळपोळ, दगडफेकप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले.

अमरावतीत पन्नास जणांना अटक

तर खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत दुपारी साडेबारानंतर छत्रपुरी खिडकी परिसरात तीन व्यापारी प्रतिष्ठानांना काही उपद्रवींनी लक्ष्य केले. बंद प्रतिष्ठाने फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज लुटला गेला, असे पोलिसांनी सांगितले. त्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. शहरात इतर ठिकाणीही गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत.

नांदेड शहरातही शुक्रवारी (ता. १२) कडकडीत बंद पाळत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. याप्रकरणी पोलिसानी सुमारे तीनशे संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले. आतपर्यं ३५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दंगलीतील इतर संशयितांच्या शोधासाठी पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतर्गत दहा पथके स्थापन करण्यात आली आहेत.

loading image
go to top