अखेर राज्य नाट्यस्पर्धेचा ‘पडदा उघडणार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडदा उघडणार

नागपूर : अखेर राज्य नाट्यस्पर्धेचा ‘पडदा उघडणार’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणारी नाट्य स्पर्धा विदर्भासह राज्यातील हौशी रंगकर्मींसांठी जिव्हाळ्याचा विषय आहे. दरवर्षी हौशी कलावंत या स्पर्धेची आतुरतेने ते वाट पाहतात. मात्र, सलग दोन वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन कोरोना कारणाने थांबले आहे. अखेर आज शासनाने या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली आहे.

गेल्या ५९ वर्षांपासून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नाट्य स्पर्धांचे आयोजन केल्या जाते. हौशी मराठी नाट्य स्पर्धेसह, संस्कृत, हिंदी या भाषांमध्ये देखील स्पर्धा पार पडतात. तर, बाल कलावंतांना रंगमंच उपलब्ध व्हावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून बाल नाट्य स्पर्धेचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला. या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेणारे कलावंत गेल्या दोन वर्षांपासून स्पर्धेच्या रंगमंचाचा ‘पडदा’ उघडण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

हेही वाचा: समाजवादी परफ्यूमला भ्रष्टाचाराची दुर्गंधी

अखेर ही वेळ आली असून सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी शासनाच्या प्रस्तावाला आज मान्यता दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी ‘दै. सकाळ’शी बोलताना दिली. स्पर्धेच्या परंपरेनुसार कुठलेही बदल करण्यात आले असून यंदा देखील ही स्पर्धा १९ केंद्रांवर सादर करण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे कलावंतांसह प्रेक्षकांना बंधनकारक असेल. साधारणत: १५ ते २० डिसेंबरपासून ही स्पर्धा सुरु करण्याचा मानस आहे. यासाठी स्पर्धक संस्थांच्या होकाराबाबत एकदा चाचपणी करण्यात येणार आहे. त्यानंतर स्पर्धेचा अंतिम कार्यक्रम जाहीर केला जाईल. दिवाळीनंतर मिळालेल्या या गोड बातमीमुळे हौशी रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय केंद्राची भर

स्पर्धेचा पडदा उघडणार या उत्साहवर्धक बातमीसह यंदा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कलावंतांना एक दिवाळी भेटसुद्धा दिली आहे. यावर्षी राज्यातील १९ केद्रांशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय केंद्रांचीसुद्धा भर स्पर्धेमध्ये पडली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे स्पर्धेचा आवाका वाढणार असून राज्याबाहेरील आणि देशाबाहेरील हौशी कलावंतसुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकणार आहे. यासाठी नियम सारखेच असले तरी या दोनही स्तरावरील स्पर्धा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.

loading image
go to top