1st Phase Poll : पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा शांत; नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर मतदारसंघात उद्या मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (ता. १९ एप्रिल) विदर्भातील नागपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया व चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार आहे.
1st Phase Poll
1st Phase Poll Sakal

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (ता. १९ एप्रिल) विदर्भातील नागपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया व चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाचही मतदारसंघातील निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज बुधवारी संपली. विदर्भातील उर्वरित पाच मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

नागपूर मतदारसंघ

नागपूर लोकसभा मतदारसंघात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य आणि दक्षिण-पश्चिम अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

  • एकूण मतदार संख्या- २२ लाख २३ हजार, २८१

  • एकूण मतदान केंद्र - दोन हजार १०५

  • एकूण उमेदवार - २६

प्रमुख उमेदवार-

  • नितीन गडकरी (भाजप)

  • विकास ठाकरे (काँग्रेस)

  • योगेश लांजेवार (बहुजन समाज पार्टी )

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. भाजपचे हेविवेट नेते आणि विकास पुरुष अशी त्यांनी दहा वर्षांत ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने नागपूरचे माजी महापौर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना उभे केले आहे. वंचित आणि एमआयएमने यावेळी उमेदवार उभा केला नाही.

बसपाचा उमेदवार नवखा आहे. त्यामुळे काँग्रेसला यावेळी मतविभाजनाचा धोका दिसत नाही. हे बघता गडकरी विरुद्ध ठाकरे अशी थेट लढत होणार आहे. गडकरी यांच्याकडे शहराचा विकास हा प्रमुख मुद्दा आहे. तर, विकासाच्या नावाखाली गडकरी यांनी शहराला भकास केल्याचा आरोप काँग्रेस करीत आहे.

नक्षल क्षेत्रात तीन वाजेपर्यंतच मतदान

मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. मात्र गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली व अहेरी हे चार विधानसभा क्षेत्र नक्षलवादग्रस्त आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या चार क्षेत्रात मतदान सकाळी ७ ला सुरू होईल. मात्र, दुपारी ३ पर्यंत मतदान करता येणार आहे. अन्य ब्रह्मपुरी व चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रात मात्र सायंकाळी ६ पर्यंत मतदान होईल.

रामटेक मतदारसंघ

रामटेक लोकसभा मतदारसंघात हिंगणा, काटोल-नरखेड, सावनेर, कामठी, उमरेड, रामटेक या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

  • एकूण मतदार संख्या- २० लाख ४९ हजार ८५

  • एकूण मतदान केंद्र -२ हजार ४०५

  • एकूण उमेदवार - २८

प्रमुख उमेदवार-

  • राजू पारवे (शिवसेना)

  • श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)

  • किशोर गजभिये (वंचित बहुजन आघाडी)

रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीने उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना आयात करून उमेदवारी दिली आहे. याकरिता खासदार कृपाल तुमाने यांचा बळी दिला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी ही संपूर्ण निवडणूक अंगावर घेतली आहे.

काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे त्यांची उमेदवारी बाद करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना वंचित बहूजन आघाडीने समर्थन जाहीर केले आहे. पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सुमारे दहा दिवस मतदारसंघात ठाण मांडले होते. मोदी यांची सभाही येथे घेण्यात आली. गजभिये यांच्या बंडखोरीमुळे येथील निवडणूक तिरंगी झाली आहे.

गडचिरोली-चिमूर मतदारसंघ

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी हे तीन, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूरहे दोन व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव असे सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.

  • एकूण मतदार संख्या - १६ लाख १२ हजार ९३०

  • एकूण मतदान केंद्रे - १ हजार ८८६

  • एकूण उमेदवार - १०

प्रमुख उमेदवार

  • अशोक नेते (भाजपा)

  • डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस)

गडचिरोली-चिमूर मतदारसंघात प्रमुख लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान व महायुतीचे अशोक नेते या दोघांमध्येच होणार आहे. सुरवातीला काँग्रेस व भाजपने तिकिट वाटपावरून बराच काळ इच्छुकांना तिष्ठत ठेवले होते.

त्यानंतर काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांच्या रूपात नवा चेहरा जनतेपुढे आणला, तर भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यावरच नवा डाव खेळला आहे. नेते यांनी २०१४ व २०१९ अशी दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे.

याशिवाय ते दोनदा आमदारही होते. त्यामुळे त्यांचा निवडणुकीचा अनुभव मोठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील डॉ. नामदेव किरसान यांनी गोंदिया जिल्ह्यातच दोनदा निवडणूक लढवली आहे. त्यांना तिथे यश आले नाही. आता गडचिरोली जिल्ह्यात ते नशीब आजमावत आहेत.

चंद्रपूर मतदारसंघ

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा या चार आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, आर्णी या दोन, अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

  • एकूण मतदार संख्या- १८ लाख ३७ हजार ९०६

  • एकूण मतदान केंद्र - २ हजार ११८

  • एकूण उमेदवार - १५

प्रमुख उमेदवार-

  • सुधीर मुनगंटीवार (भाजप)

  • प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

  • राजेश बेले (वंचित बहुजन आघाडी)

मागील निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर चंद्रपूर मतदारसंघातून निवडून आले होते. ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे यंदा काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाच रिंगणात उतरवले आहे.

भाजपने राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. यावेळी मोठे मतविभाजन करणारा उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे मुनगंटीवार व धानोरकर या दोघांतच मुख्य लढत होईल हे स्पष्ट झाले आहे.

मागील निवडणुकीत वंचिला वंचितला आठ टक्के मते मिळाली होती. ती मते कुणीकडे वळणार यावरच येथील विजयी उमेदवाराचे मताधिक्य अवलंबून राहणार आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची चंद्रपुरात सभा झाली. मात्र, काँग्रेसने एकही मोठी प्रचारसभा येथे घेतली नाही. प्रचारातील मुद्देही स्थानिक पातळीवरीलच राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com