esakal | लोक कलावंतांचे पोटासाठी 'प्रयोग'; कोणी करतोय चौकीदारी, तर कोणी मजुरी

बोलून बातमी शोधा

Drama
लोक कलावंतांचे पोटासाठी 'प्रयोग'; कोणी करतोय चौकीदारी, तर कोणी मजुरी
sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : राधानाथ (गवळण), गम्मत, खडी गम्मत, गोंधळी (रेणुराई), दंडार, डाहाका असे विदर्भातील विविध लोककला प्रकार देशासह जगामध्ये प्रसिद्ध आहेत. या कला टिकवून ठेवण्यासाठी आजवर प्रत्येक कलावंत तितक्याच ताकदीने गावोगावी त्याचे सादरीकरण करीत आला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या लोक कलावंतांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे, चौकीदार, मजुरी, व्यवसाय करीत उत्पन्न मिळविण्यासाठी नव नवे 'प्रयोग' करीत आहेत.

हेही वाचा: बाळांना कोरोनाचा धोका असतो का? वाचा काय सांगतात डॉ. देशमुख

एकेकाळी लोककलेला राजाश्रय होता. राज सत्ता जस जशी संपुष्टात आली तस तशी लोक कलावंतांना मिळालेली वतनदारीसुद्धा संपुष्टात आली. तर, मोबाईलच्या माध्यमातून घराघरांत मनोरंजन पोहोचल्याने वर्तमानकाळात या लोककलांना प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या साधनामध्ये स्थान मिळणेही बंद झाले. उल्लेखनीय म्हणजे, विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा या लोककलावंतांच्या नावाने नागपूर व अमरावती येथे असणाऱ्या विद्यापीठांमध्ये लोककला विषयच अभ्यासक्रमामध्ये नाही. त्यामुळे, या कलेबाबात पुस्तकी ज्ञानसुद्धा पुढील पिढीला कधी मिळाले नाही. परिणामी, राजाश्रय मिळालेल्या लोककलावंतांच्या पुढील पिढीला आपला चरितार्थ भागविण्यासाठी आज मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. लोककला प्रकाराची नाळ ही ग्रामीण भागाशी जुळली असल्याने तंत्रज्ञानाचा आधार घेत या कलेतून उत्पन्न मिळविणे कलावंतांसाठी अशक्य अशी गोष्ट आहे. शिवाय, हा जिवंत कला प्रकार असल्याचे या खेळांना प्रत्यक्ष पाहण्यातून मिळणारी मजा तळ हाताएवढ्या साधनातून मिळणेही कठीण आहे.

हेही वाचा: 'मी माझं आयुष्य जगलो', ८५ वर्षीय आजोबाने दिला तरुणाला बेड अन् स्वतः पत्करले मरण

कलावंतांनी लोककला टिकविण्यासाठी पारंपारिकता कायम ठेवत कूच बदलली पाहिजे. प्रेक्षकांना क्षरण जात कलेचे सादरीकरण करायला नको. तसेच, शासनाने आपल्या योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी लोककलांचा आधार घ्यावा. यामुळे, शासनाला फायदा आणि कलावंतांनासुद्धा आधार मिळेल.
-डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अभ्यासक
लोककला टिकविण्यासाठी प्रेक्षक आणि शासनाने सहकार्य करायला हवे. विद्यापीठाच्या प्रयत्नातून अभ्यास वर्ग आणि शासनाच्या माध्यमातून लोक कलेविषयी कार्यशाळा, शिबीराचे आयोजन केल्यास पुढील पिढीपर्यंत ही कला पोहोचेल. तसेच, या कलावंतांना मान सन्मान व उत्पन्नही यातून मिळेल. मात्र, तीन मुख्यमंत्री बदलूनही याबाबतचे प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात आहेत.
-प्रा. डॉ. मनोज उज्जैनकर, लोक कलावंत