मुसळधार पाऊस, थंडी अन्‌ ते चौघे, वाचा काय झाले...

Four die due to rain and cold in Nagpur
Four die due to rain and cold in Nagpur

नागपूर : पावसामुळ सर्वत्र गारठा पसरला आहे. एक दिवसाआड काही ना काही प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसाने गुरुवारी सकाळी जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांची अडचण झाली. पावसामुळे स्वेटर घालावे की रेनकोट असा प्रश्‍न अनेकांना पडला होता. दुसरीकडे कडाक्‍याच्या थंडीमुळे शहरात चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

पाऊस काही केल्या नागपूरकरांचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. मॉन्सून परत गेल्यानंतरही तो परत परत येत आहे. आतापर्यंत अवकाळी पावसाने अनेकदा हजेरी लावली. पाऊस एक आणि दोन जानेवारील वादळी वारे व गारपीट घेऊन येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असताना गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर स्वेटर घालून राहावे लागले. 

यंदा उशिराने आलेल्या पावसाने विदर्भात चांगलाच धुमाकूळ घातला. सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळला. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. मॉन्सून परतल्यानंतरही पाऊस विदर्भातून जायचे काही नाव घेत नाही आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाही पाऊस येऊन गेला. तो आता जाईल, असे वाटत असताना गुरुवारी पुन्हा हजेरी लावली. यामुळे पहाटे फिरायला निघणाऱ्यांची पावसामुळे चांगलीच अडचण झाली. तसेच चौघांना आपला जीव गमवावा लागला.

सीताबर्डी फुटपाथ

सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी गोवारी उड्डाणपुलाखाली मुनलाईट फोटो स्टुडिओसमोरील फुटपाथवर एका 40 ते 45 वर्षे वयोगटातील एका अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेह आढळलेल्या या व्यक्‍तीचा थंडीमुळे मृत्यू झाला असावा, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी हेमंत शंकर मानवटकर (35) यांनी दिलेल्या सूचनेवरून सीताबर्डी पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. 

साई मंदिराजवळील फुटपाथ

60 वर्षे वयोगटातील एका अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह साई मंदिराजवळील फुटपाथवर गुरुवारी आढळला. त्या वृद्धाचाही कडाक्‍याच्या थंडीमुळे मृत्यू झाल्याची शक्‍यता धंतोली पोलिसांनी वर्तविली आहे.

कळमना परिसर

तोटाबग्गा सिंग (वय 60) यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास कळमना परिसरातील सुरजचंद राजकुमार यांच्या दुकानासमोर आढळून आला. ते कडाक्‍याच्या थंडीत उघड्यावरच झोपले होते. त्यांचा थंडीमुळे मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. याशिवाय सदर येथील मनपा कार्यालयाजवळही एक 60 वर्षीय पुरुष मृतावस्थेत आढळून आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com