esakal | मेडिकलमध्ये सापडला 'मुन्नाभाई', डॉक्टर असल्याचं सांगत रुग्णालयात वावर
sakal

बोलून बातमी शोधा

gmc

मेडिकलमध्ये सापडला 'मुन्नाभाई', डॉक्टर असल्याचं सांगत रुग्णालयात वावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कधी निवासी डॉक्टर, तर कधी वैद्यकीय अधिकारी बनून मेडिकल (nagpur government medical college) परिसरात फिरणाऱ्या एका तोतया डॉक्टरला मेडिकल प्रशासनाने पकडले. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कथानकाला शोभेल, अशाच प्रकारे तो तोतया डॉक्टर मेडिकलमध्ये वावरत होता. मात्र, काही डॉक्टरांना त्याच्यावर शंका आल्याने तो अलगद प्रशासनाच्या हातात गवसला. त्याला अजनी पोलिसाच्या (ajni police station nagpur) स्वाधीन करण्यात आले. विशेष असे की, कोरोनाच्या (coronavirus) प्रादुर्भावात या मुन्नाभाईने अनेक मित्रांना सीटी स्कॅनपासून तर कार्ड काढून देण्यापर्यंत मदत करण्याचे सत्कर्म केले. (fraud man found in nagpur government medical college)

हेही वाचा: तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल! दररोजचे प्रसंग

सिद्धार्थ जैन असे या मुन्नाभाईचे नाव आहे. तो २३ वर्षांचा आहे. दिल्लीतील एम्समधून वैद्यकीय पदवी संपादन केल्याचे सांगत होता. काहींना निवासी डॉक्टर तर काहींना मुख्य वैद्यकीय अधिकारी असल्याचा बनाव करीत होता. ऑपरेशन थिऐटरपासून तर विविध वॉर्डात बिनदिक्कत तो प्रवेश करीत होतो. रुग्णांच्या फाईल बघण्यापासून तर नातेवाईकांशी चर्चा करीत असल्याचे चौकशीतून पुढे आले. खरचं तो डॉक्टर आहे का, त्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाची कोणती आणि कधी पदवी मिळविली इथपासून ते त्याचा मेडिकलमध्ये फिरणाऱ्या दलालांशी काही संबंध आहे, का याचाही पोलिसांकडून शोध सुरू झाला. मात्र, यात त्याने बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्याला डॉक्टर बनायचे होते.

कोणालाही संशय येऊ नये म्हणून शल्यक्रियागृहात वापरला जाणारा हिरवा रंगांचा ड्रेसकोड तसेच गळ्यात स्टेथॉस्कोप घालून बेधडकपणे मेडिकलमध्ये फिरत होता. गुरुवारी सकाळी मेडिकलच्या जुन्या कॅज्युअल्टीजवळील डिझास्टर वॉर्डात आला. तिथे तो एका रुग्णाची चौकशी करीत होता. निवासी डॉक्टरांना त्याचा संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. या बाबत तातडीने मेडिकलमधील सुरक्षा रक्षकांना माहिती देण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी पाळत ठेवली. मात्र, आपल्यावर पाळत असल्याचे त्याला कळले. दरम्यान, पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले आणि अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

अनेकांना केली मदत -

तोतया डॉक्टरच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या काही मोबाईल क्रमांकावर फोन केले असता, कोविड काळात अनेकांना त्याने मदत केली असल्याचे चौकशीतून पुढे आले. बऱ्याच जणांना वॉर्डात प्रवेश देण्यापासून तर सीटी स्कॅन, कार्ड काढून देण्यापर्यंत मदत केली असल्याचे पुढे आले.