Nagpur : शुक्रवारी चोरी, सोमवारी पंचनामा? पोलिसांचा प्रताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : शुक्रवारी चोरी, सोमवारी पंचनामा? पोलिसांचा प्रताप

Nagpur : शुक्रवारी चोरी, सोमवारी पंचनामा? पोलिसांचा प्रताप

टाकळघाट (जि. नागपूर) : घराच्या आवारात पार्क केलेली दुचाकी चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यास गेलेल्या तक्रारकर्त्याला एका महिला पोलिसाने हाकलून लावल्याचा प्रकार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास एमआयडीसी बुटीबोरी ठाण्यात घडला होता. त्याच दिवशी तक्रारकर्त्याने पुन्हा जाऊन सकाळी साडे दहाच्या सुमारास तक्रार देऊन घटना दाखल करून घेतली. मात्र या घटनेचा पंचनामा तब्बल दोन दिवसांनी केल्याने एमआयडीसी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले . या सर्व प्रकारावर विशेष पोलिस महानिरीक्षक, ग्रामीण पोलिस अधीक्षक लक्ष घालतील का, असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे.

हेही वाचा: कंगनाच्या 'भीक' या विधानावर जावेद अख्तर उखडले, म्हणाले...

तक्रारकर्ता चंद्रशेखर ज्ञानेश्वर पोहाने राहणार वार्ड क्र.२ टाकळघाट (ता.हिंगणा) यांची घरासमोरील आवारात उभी केलेली दुचाकी (क्र.एमएच ४०. आर ०६८८) ही चोरीला गेल्याने १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास तक्रार दाखल करायला गेले असता त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने त्यास हाकलून लावल्याचा आणि त्याच दिवशी सकाळी साडे दहाच्या दरम्यान तक्रार घेऊन घटना दाखल करून घेतल्याचा प्रकार वृत्तपत्रांतून प्रकाशित झाला होता.

मात्र कर्तव्यावर असणारे पोलिस अधिकारी यांनी या घटनेचे कोणतेच गांभीर्य लक्षात घेतले नाही. चोरीसारख्या घटनेत घटना दाखल झाल्यावर तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करणे आवश्यक असताना याकडे कुणीही लक्ष घातले नाही. घटनेच्या तब्बल दोन दिवसांनी या घटनेचा पंचनामा केल. त्यामुळे पोलिसी कर्तव्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यावरून पोलिस इतर घटनांत किती गांभीर्याने तपास करीत असतील याचा अंदाज लावता येईल. पोलिसांच्या या कारभाराकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून पंचनामा दोन दिवस का प्रलंबित ठेवला, याची सखोल चौकशी करतील का, असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.

हेही वाचा: "एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी"

नियम काय आहे?

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २ (ह) अन्वये कोणत्याही घटनेत गुन्हा झाल्याचे कळताच गुन्ह्याच्या जागेची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करणे अनिवार्य आहे. कारण घटनास्थळावर जाण्यास उशीर झाला तर त्या गुन्ह्यातील पुरावे नाहीसे होण्याची शक्यता असते. चोरीच्या या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी फौजदारी प्रक्रियेतील नियमांना बगल देऊन आपल्या कर्तव्यात कसूर केला. पोलिसांच्या अशाच कारभारामुळे गुन्हेगारांना काबीज करण्यात यश मिळत नाही हे मात्र खरे.! चोरीच्या या घटनेत पोलिसांनी समयसूचकता बाळगली असती तर कदाचित चोराला पकडण्यात कदाचित यश मिळाले असते.

loading image
go to top