esakal | गरबा, दांडियाच्या पोशाखाला ‘अच्छे दिन’ | Dress
sakal

बोलून बातमी शोधा

Dandia

गरबा, दांडियाच्या पोशाखाला ‘अच्छे दिन’

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर - राज्य शासनाने नवरात्रीत गरबा आणि दांडिया यावर बंदी घातली असली तरी काही ठिकाणी तो खेळला जातो आहे. त्यामुळे गरबा आणि दांडियाच्या पोशाखांनी सजलेली बाजारपेठेत सध्या वर्दळ वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी अधिक असल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा नवरात्र उत्सव पूर्ववत होईल या आशेने गरब्याच्या पोशाख विक्रेत्यांनी जोरदार तयारी केली होती. गेल्या वर्षीच्या बंदीनंतर यंदा प्रतिसाद चांगला मिळेल म्हणून नवनवीन नक्षीचे पोशाखही तयार करून घेण्यात आले. त्यानुसार हवा तसा प्रतिसाद दिसत नसला तरी बाजारातील वर्दळ वाढली आहे.

त्यामुळे विक्रीतही वाढ झालेली आहे. कोरोना संसर्ग वाढू नये या उद्देशाने उत्सवाच्या काही दिवस आधी गरबा आणि दांडियावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरबा खेळला जात नसला तरी काही ठिकाणी त्याचा उत्साह कायम असल्याचे चित्र आहे. परिणामी, बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.

या पोशाखाची विक्री करण्यासाठी दरवर्षी सुरत, अहमदाबाद या भागांतून माल बोलविण्यात येतो. मागील वर्षी कोरोनामुळे बाजार थंड होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी गरब्याच्या साहित्यांची मागणी केली होती. त्यानुसार मागणीही वाढलेली आहे. काही ठिकाणचा मालही संपलेला आहे.

हेही वाचा: सोने खरेदीची हीच योग्य वेळ; दसऱ्याला सुवर्ण संधी

‘नवरात्रीच्या आठ ते दहा दिवस अगोदर माल विक्रीसाठी आणत असतो. मगील वर्षी कोरोनामुळे माल विक्रीसाठी आणला नव्हता. यंदा व्यवसाय होईल अशी आशा होती; त्यानुसार व्यवसायाला बळ मिळाले आहे. ग्राहकांची मागणी वाढू लागली आहे.

‘करोना नव्हता तेव्हा दर दिवशी मोठ्या प्रमाणात कपड्यांची विक्री व्हायची आणि भाड्यानेही दिले जायचे. या वेळी त्यातुलनेत कमी असले तरी मागणी आहे. लहान मुलांसाठी किरकोळ मागण्याही येत आहेत. गेल्या वर्षी परिस्थिती गंभीर असल्याने झालेले नुकसान आम्ही समजू शकतो; पण यंदा मात्र व्यवसायाला बुस्ट मिळाला आहे.

गरबा आणि दांडियाच्या पोशाखाची मागणी वाढलेली आहे. मागील दोन वर्षांपेक्षा अधिक मागणी सध्या होत आहे. गरबा कुठे खेळला जातो हे माहीत नाही मात्र, कपड्याच्या मागणीत वाढ झालेली आहे हे मात्र नक्की.

- अश्विन संजय गुहे, माऊली गारमेंट्स, सेंट्रल एव्हेन्यू

loading image
go to top