esakal | आशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयाचं शवागार हाऊसफुल्ल
sakal

बोलून बातमी शोधा

corona dead body

आशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयाचं शवागार हाऊसफुल्ल

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाल्या आहेत. मेडिकलमध्ये सारे वॉर्ड हाउसफुल्ल झाले. २० खाटांच्या कॅज्युल्टीत पन्नास रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खाटाच नसल्यामुळे मेडिकलमधील कॅज्युल्टी आता जाम झाली. यामुळे कॅज्युल्टीला कुलूप लावण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे रात्रभर होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली. एकाच रात्रीत कोरोनाबाधित आणि इतर आजारांचे सुमारे ८० जणांचे मृत्यू झाले. यामुळे आता रात्री शवागारांची क्षमता संपली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असताना देखील या रुग्णालयातील यंत्रणा कोरोनामुळे कोलमडली आहे.

हेही वाचा: १५ दिवसांत तब्बल ३४ मृत्यू! गावात स्मशान शांतता

मेडिकलमधील शवविच्छेदनगृहातील बॉडी कॅबिनेटमध्ये ४८ शव ठेवण्याची क्षमता आहे. शवागाराच्या क्षमतेपेक्षा दुप्पट मृत्यू होत असल्याने शवागारात ठेवणे अशक्य आहे. मध्यरात्री वॉर्डात कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवागारात पोहोचवण्यात आले. मात्र, येथे मृतदेह ठेवण्यासाठी जागा आणल्यानंतर परत वॉर्डात न्यावे लागत असल्याची माहिती पुढे आली आहे. हीच स्थिती मेयोची आहे. मेयोतील शवागाराची क्षमता मेडिकलपेक्षा निम्मी आहे. येथे ३० पेक्षा जास्त शव ठेवता येत नाही. यामुळे मेयोच्या कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना बळी ठरलेल्यांचे शव रात्रभर जवळच असलेल्या एका खोलीत ठेवतात. यानंतर पहाटे ६ वाजतापासून मेयोतील शवविच्छेदनगृहात मृतदेह पोहचवण्यास सुरूवात होत असल्याचे खुद्द मृतकांच्या नातेवाइकांनी सांगितले आहे. त्यातच मेयो असो की, मेडिकल कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर अनेकदा नातेवाईक उशिरा येतात. अशा शवांची दर दिवसाला पंधरावर संख्या आहे. तर मेयोतही ते १० शव नातेवाइकांच्या प्रतिक्षेत असतात. तर काही बेवारस शव किमान सात दिवस ठेवल्यांनतरच त्यांची विल्हेवाट लावावी लागते.

हेही वाचा: वऱ्हाडींनो लग्नात जाताय? मग लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी आवश्‍यक

रात्रीच्या अंधारात अविरत मृतदेह पोहविण्याचे काम -

मेडिकलच्या विविध कोविड वॉर्डात मृत्यू झाल्यानंतर येथे तैनात शववाहिकतून शव शवागारात पोहचवण्यात येते. दिवसा पोहचवणे काही कठिण नाही, परंतु रात्रीच्या अंधारात शववाहिकेतून दर पाच ते पंधरा मिनिटांनी शव शवागारात पोहचवण्यात येते. हे काम रात्रभर सुरू असते.

मेडिकलमध्ये कोरोना मृत्यूचा आकडा वाढत आहे. दर दिवसाला जवळपास ७५ मृत्यू होतात. यात कोरोना व इतर मृत्यूंचा समावेश आहे. शवागारात गर्दी होते. परंतु दर दिवसाला गैरकोरोना व कोरोनाचे शवागारातून ६० पेक्षा अधिक मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात येतात. जे नातेवाईक वेळेत पोहचत नाही, असे शव ठेवावे लागतात.
-डॉ. मुखर्जी, विभागप्रमुख, न्याय वैद्यकशास्त्र विभाग, नागपूर.
loading image